आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी चर्चेतील नाव माझ्या सोईचे; खासदार अॅड. शरद बनसोडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विविध इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. आमदार रमेश कदम, अॅड. प्रकाश आंबेडकर, राजा सरवदे यांच्यासह इतर पक्षातील चर्चेमधील नावांचे उमेदवार असल्यास ते काँग्रेसची मतं मिळवतील. भाजपची उमेदवारी मलाच असून विरोधी पक्षातील त्या इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात आल्यास माझ्यासाठी फायदेशीर आहे, असे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी स्पष्ट केले. 


केंद्र शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी ग्रामीण संपर्क अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, तलाठी कार्यालयांसह विविध ठिकाणी आढळलेल्या गैरसोयी, त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना भेटून त्याबाबत चर्चा केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


शाैचालय कागदावरच? 
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी कोट्यवधींचा निधी शासनाने दिला. पण, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शौचालय कागदावर असणे, बांधूनही त्याचा वापर न करण्याचे प्रकार समोर आलेत. आरोग्य केंद्रांमध्ये निवासी डॉक्टर नसणे, चांगले उपचार, आैषधांचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. 


शिंदेंवर टीका 
केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकांना खूश करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी विमानतळाचे गाजर दाखविले. तसेच, देशभरात सर्वांनी नाकारलेला एनटीपीसी प्रकल्प सोलापुरात आणला. त्यामुळे सोलापूरकरांना मोफत वीज सुविधा किंवा इतर प्रत्यक्ष किती जणांना कायम रोजगार निर्मिती झाली? असे प्रश्न उपस्थित केले. उजनी धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे तीन टीएमसी पाणी त्या कंपनीला दिले. त्याऐवजी कंपनीकडून पंढरपूर परिसरात छोटे धरण उभारून घेणे अपेक्षित होते. बोरामणी विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर २०१३ साली विमान प्राधिकरणाने एक परिपत्रक काढले. त्यात विमानतळाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ४९ टक्के तर केंद्र सरकारने ५१ टक्के खर्च करावे असे म्हटले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज परदेशात येजा करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे नाही. 


सहकार मंत्र्यांच्या मदतीविना खासदार 
२००९ साली ना. सुभाष देशमुख हे माढ्यातून तर २०१४ साली त्यांच्या मुलाने उस्मानाबादमधून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यामुळे त्या दोन्ही निवडणुकीत त्यांची मदत मला मिळाली नव्हती. त्यांच्या मदतविनाच मी खासदार झालो. आगामी निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार पुन्हा सोलापूरचे दिल्लीत नेतृत्व करणार आहे. त्यावेळी पक्षाचे उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख निश्चित सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...