आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन धार्मिक पर्यटन केंद्रावर झाले शिक्कामोर्तब; तीन पीठांच्या जगद्गुरूंचा एकमुखी उद््घोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वीरशैव धर्माची स्थापना जगद््गुरू पंचाचार्यांनी प्राचीन काळी केली. देशाच्या विविध प्रांतातील अनेक संत महंतानी वीरशैव धर्माचा प्रचार केला. वीरशैव धर्मामध्ये अनेक पोटजाती आहेत. त्या त्यांच्या व्यवसाय व कामांमुळे निर्माण झाल्या आहेत. वीरशैव व लिंगायत वेगवेगळे नसून एकच धर्म आहे. लिंगायत समाजाला केंद्र व राज्याने ओबीसीचा दर्जा द्यावा, अशी मागणी उज्जैन, श्रीशैल आणि काशीपीठाच्या जगद््गुरूंनी केली. 


अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिर येथे संकल्पसिद्धी महोत्सवातील वीरशैव लिंगायत संमेलनात आशीर्वचनात त्यांनी ही भूमिका मांडली. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रशांत परिचारक, महापौर शोभा बनशेट्टी, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे आदी उपस्थित होते. 


बृहन्मठ होटगी संस्थेने उभारलेले भव्य शिवालय हे गेल्या नऊ - दहा वर्षांत नवीन श्रद्धाकेंद्र म्हणून विकसित होत आहे. ११ दिवस चाललेला लाखो लोकांना सामावून घेणारा संकल्पसिद्धी महोत्सव, मुख्यमंत्री आणि चार पीठांचे जगद्गुरू यांची उपस्थिती यामुळे सोलापुरातील या नवीन धार्मिक पर्यटन केंद्रावर शिक्कामोर्तब झाले आहे. 


लिंगायतांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना द्या आरक्षण : काशी जगद््गरू 
वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना प्राचीन काळात झाली आहे. महाराष्ट्रात संत िशरोमणी मन्मथ स्वामी तर कर्नाटकात महात्मा बसवेश्वर यांनी वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार केला. मूळ वीरशैव आहे, लिंगायत या पोटजाती आहेत. वीरशैव लिंगायत धर्मातील अनेक पोटजाती या आर्थिकदृष्ट्या खूपच दुर्बल आहेत. त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे. यासाठी राज्याने याची केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी काशी जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केली. 


ओबीसीत स्थान द्या : उज्जैन जगद््गुरू 
श्रीशैल जगदगुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी लिंगायत धर्माची महती सांगितली. वीरशैव आणि लिंगायत एकच असल्याचे स्पष्ट केले. लिंगायत धर्मामुळेच संकल्पसिद्धी सोहळा यशस्वी झाल्याचे सांगितले. शासनस्तरावर समाजातील सर्वांनी एकत्र येऊन हिंदू लिंगायतला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करावी, असे आवाहन केले. यानंतर उज्जैन जगदगुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले. 


तपोरत्नं योगीराजेंद्र यांच्या तपस्येमुळेच संकल्पसिद्धी : श्रीशैल जगद््गुरू 
तपोरत्नं योगीराजेंद्र महास्वामीजी यांच्या अडीच वर्षे तपस्येमुळेच ही संकल्पसिद्धी होत असल्याची स्पष्टोक्ती जगदगुरूंनी केली. होटगी बृहन्मठातून शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण, सामाजिक कार्य व भावी पिढी संस्कारित करण्याचे काम सुरू आहे. तपोरत्नं यांनी समाजाच्या कल्याणासाठी १००८ शिवलिंगांची स्थापना व १०८ फूट उंच मूर्ती उभारणीचा संकल्प केला. तो पूर्ण होईपर्यंत अडीच वर्षे फक्त पाण्यावरच राहिले. आज संकल्प पूर्ण झाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभले नसले तरी ते आपल्यातच असल्याचे श्रीशैल जगदगुरू यांनी आशीर्वचनात स्पष्ट केले. 


३३ जोडप्यांचे झाले शुभमंगल... 
१००८ शिवलिंगाची स्थापना व १०८ फूट उंच मूर्तीचा लोकार्पण सोहळा पूर्ण झाल्यानंतर ३३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी उज्जैन जगदगुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल जगदगुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी नववधूंना आशीर्वाद दिला. यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, विश्वनाथ चाकोते, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार यांच्यासह संकल्पसिद्धी महोत्सवाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...