आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात ९२.२७ टक्के विद्यार्थी यश शिखरावर, चैत्राली कुलकर्णीला सर्व विषयांत पैकीच्या पैकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/सोलापूर- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. बारावीप्रमाणे इयत्ता दहावीतही मुलींनीच बाजी मारली. सोलापूर जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात एकूण ९४.८० टक्के मुली आणि ९०.३२ टक्के मुले उत्तीर्ण झाले. गत वर्षी जिल्ह्याचा ९२.४७ टक्के इतका निकाल लागला होता. यंदा ०.२० टक्क्यांनी निकाल कमी लागला असून, जिल्ह्याचा निकाल ९२.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात ६५ हजार ८८१ परीक्षार्थींनी दहावीची परीक्षा दिली होती. 


चैत्रालीचे 'सुयश' 
सोलापुरातील सुयश विद्यालयाच्या चैत्राली कुलकर्णीने सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले. तिने १०० टक्के गुणांचा षटकार ठोकला. याचे श्रेय गुरुजन, आई- वडिलांना तिने दिले आहे. 


फेरपरीक्षा १७ जुलैपासून
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी फेरपरीक्षा (पुरवणी परीक्षा) १७ जुलैपासून होणार आहे. श्रेणीसुधार, गुणसुधार (क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. पुरवणी परीक्षा आणि मार्च २०१९ मधील परीक्षा, अशा दोन परीक्षांद्वारा योजनेचा लाभ घेता येईल. 


९१.९७% मुली उत्तीर्ण 
दहावीत विद्यार्थिनींचा निकाल ९१.९७%, तर विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७.२७ इतकी आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ४.७०% अधिक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के लागला. 


३३ शाळांना भोपळा 
शून्य टक्के निकालाच्या सर्वाधिक शाळा ९ औरंगाबाद विभागात आहेत. कोल्हापूर आणि कोकण विभागात शून्य टक्के निकालाची एकही शाळा नाही. अन्य विभागांत पुणे - ३, नागपूर - ४, मुंबई ५, अमरावती २, नाशिक ४, लातूर ६. 


विभागनिहाय निकाल 
विभाग टक्केवारी १००% 
कोकण ९६.००% २४९ 
कोल्हापूर ९३.८८% ६८१ 
पुणे ९२.०८% ७६० 
मुंबई ९०.४१% ८१६ 
औरंगाबाद ८८.८१% ३३५ 
नाशिक ८७.४२% ३६८ 
अमरावती ८६.४९% २९७ 
लातूर ८६.३०% १७७ 
नागपूर ८५.९७% ३४५ 

बातम्या आणखी आहेत...