आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाखांचा निधी खर्ची टाकण्याचा खेळ, क्रीडा कार्यालयाने केला फार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मंगळवारी (२७ मार्च) जिल्हा क्रीडा कार्यालयाने दोन महाविद्यालयांमध्ये निवासी शिबिरे सुरू असल्याचे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन पाहिले तर वेगळाच प्रकार दिसून आला. एका महाविद्यालयात शिबिर सुरू झाले नसल्याचे दिसून आले तर शहरातील दुसऱ्या ठिकाणी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिबिराचा सोपस्कार उरकणे सुरू केल्याचे आढळून आले. दोन शिबिरांसाठी सुमारे ४ लाखांच्या निधीची तरतूद आहे. 


मार्चअखेरच्या घाईगडबडीत क्रीडा कार्यालयाने निधी खर्ची टाकण्याचा खटाटोप सुरू केला आहे. यासाठी युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण शिबिराचा आडोसा घेण्याचा प्रकार केला आहे. शासनाच्या युवा धोरणानुसार स्पर्धेच्या युगात युवक आणि युवतींमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी युवा नेतृत्व व व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. जिल्हा क्रीडा कार्यालयाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सूचनेनुसार मार्चअखेर दोन निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. शिबिरार्थींचा सहभाग वाढू नये यासाठी निवेदन प्रसिद्ध न करण्याचा प्रताप जिल्हा क्रीडा कार्यालयाने केला आहे. 


शिबिरे घेण्यासाठी शासनाचे भव्य जिल्हा क्रीडा संकुल असताना एक शहरातील व एक शहराबाहेरील संस्था यासाठी निवडण्यात आली. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू अाहेत. त्यामुळे विद्यार्थी सहभागी होतील का? या शिबिरातून शासनाचा मूळ उद्देश होणार आहे का? याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाला काही देणे- घेणे नाही असे दिसून येत आहे. 


मंगळवारी जिल्हा क्रीडाधिकारी नाईक म्हणाले होते, शिबिराला मिळाला १०० टक्के प्रतिसाद 
युवा नेतृत्व व व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण शिबिरास मंगळवारपासून (दि. २७) दोन ठिकाणी सुरुवात झाली का? याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याकडून घेतली असता त्यांनी ही दोन्ही शिबिरे सुरू झाली असल्याचे सांगितले. ५० पेक्षा जास्त युवक व युवतींना प्रवेश देता येत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ५० युवक व युवती सहभागी झाले असल्याचेही ते म्हणाले. 


बुधवारी फोनच उचलला नाही 
बुधवारी (दि. २८) 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने दोन्ही शिबिर केंद्रांवर भेट दिली असता केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हे शिबिरच सुरू झाले नसल्याचे दिसून आले. युवक व युवतींचा प्रतिसाद नसल्यामुळे हे शिबिर ३१ मार्चपासून सुरू होणार असल्याचे शिबिरप्रमुख गणेश खंडागळे यांनी सांगितले. याबाबत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 


दयानंद परिसरातील खेळाडू 
दयानंद महाविद्यालयाच्या हॉलमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिरात दयानंद महाविद्यालय परिसर शाळांतील खेळाडू होते. दयानंदसह आसावा, सहस्त्रार्जुन व एस.के. बिराजदार प्रशालेचे हे खेळाडू असल्याचे शिबिर प्रमुख शैलेश बंडे यांनी सांगितले. परंतु या शिबिराचा लाभ शहर व जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील गरजू युवक व युवतींना मिळणे आवश्यक होते. 


पत्र मार्चमध्ये आले 
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सदर शिबिरे घेण्याचे पत्र मार्च महिन्यात आले आहे. त्यामुळे ही शिबिरे मार्चअखेरला घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीही दोन्ही शिबिरास शंभर टक्के प्रतिसाद आहे.
- युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी