आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन डब्यांतून 'हुतात्मा'चा प्रवास होणार वेगवान, सुरक्षित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या १८ वर्षांपासून सोलापूरकरांचा हुतात्मा एक्स्प्रेसच्या जुनाट डब्यातून सुरू असलेला प्रवास आता लवकरच संपणार आहे. कारण हुतात्माचा आयसीएफचा रेक बदलून जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेला एलएचबी (लिंक हॉफमन बुश) दर्जाचा रेक हुतात्मा एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. लवकरच हा रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असून, यानंतर हा रेक सोलापूर-पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला वापरला जाणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या दोन इंटरसिटी गाड्यांना एलएचबीचा रेक वापरण्यात आला आहे. 
 
१५ जुलै २००१ रोजी सुरू झालेली सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही सोलापूरकरांची जिव्हाळ्याची गाडी आहे. गाडी सुरू झाल्यापासून आजतागायत लाखो प्रवाशांनी या सेवेचा अनुभव घेतला. गाडी जरी २००१ मध्ये सुरू केली असली तरी याचे डबे मात्र १९९० व १९९२ मध्ये तयार झालेले आहेत. डब्यांचे आयुर्मान संपले असले तरी ते डबे हुतात्मा एक्स्प्रेसला जोडलेलेच आहेत. त्यामुळे सोलापूकरांचा प्रवास हा जुनाट डब्यांतून सुरू आहे. जुनाट डब्यांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. मात्र आता प्रवाशांना नव्या व गतिमान असलेल्या एलएचबी रेकमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. 
 
अशी आहेत एलएचबीची वैशिष्ट्ये
एलएचबी म्हणजे लिंक हॉपमन बुश. या रेल्वे डब्यांची निर्मिती जर्मन तंत्रज्ञानाने व स्टेनलेस स्टीलच्या साह्याने केली जाते. या डब्यांचे वजन अन्य डब्यांच्या तुलनेने १० ते १२ टन कमी असते. त्यामुळे हे डबे वेगाने धावू शकतात. 
 
डबे एकमेकांवर चढत नाहीत 
एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्यांना आयसीएफ दर्जाचे डबे वापरण्यात येत होते. अपघात होताच किंवा चालकाने आपत्कालीन ब्रेक लावल्यानंतर पाठीमागील डबे पुढील डब्यांवर आदळतात. परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. एलएचबी डब्यांमध्ये हा धोका नाही. कारण अॅन्टी टेलिस्कोपिक डिझाइनमुळे अशा डब्यांवर पाठीमागून आलेला दबाव काही सेकंदांतच डब्यांच्या शेवटी असलेल्या वेसटिबुल येथे जातो. कोचच्या आतील दरवाजाजवळ हा दबाव रोखला जातो. परिणामी आतील प्रवासी सुरक्षित राहतात. शिवाय याची ब्रेकिंग सिस्टीम देखिल अद्ययावत आहे. यात डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. अन्य डब्यांत ही सुविधा नाही. 

बातम्या आणखी आहेत...