आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गणपतराव देशमुखांकडून अधिकाऱ्यांची हजेरी; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : मोहिते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्र शासनाकडून शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या अनेक योजना राबविल्या जात असताना अधिकाऱ्यांकडून योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न होत नाही. शेतकरी अपघात विमा योजना, रोजगार हमी योजना, महावितरणच्या योजना व सर्व शिक्षा अभियानाबाबत अधिकारी लक्ष घालत नसल्याचे बैठकीत दिसून आले. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी बैठकीत अपूर्ण माहिती सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तर केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासास गतिमान करावे. या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्यरत राहावे, असे आवाहन खासदार तथा जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांनी केले. 


खासदार मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा झाली. यावेळी समितीचे सदस्य आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त अविनाश ढाकणे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे आदी उपस्थित होते. 


खासदार विजयसिंह मोहिते यांनी सांगितले की, ग्रामीण आणि शहरी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य आराखडे, प्रस्ताव सादर करणे, त्यांना मंजुरी घेणे या बाबींवर संबंधित यंत्रणांनी भर द्यावा. केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध निधी मुदतीत खर्च करावा, निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. आमदार गणपतराव देशमुख आणि आमदार भारत भालके यांनी सूचना मांडल्या. 


यावेळी महात्मा गांधी रोजगार योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, भूमी अभिलेख संगणकीकरण, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्मार्ट सिटी अभियान, आरोग्य, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री आवास, कौशल्य विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने उपस्थित होते. 


संसद आदर्श योजनेचा आढावाच नाही... 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एका वर्षात एक आदर्श ग्राम करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार आदर्श ग्राम करण्याची योजनाही जिल्ह्यात राबविण्यात आली. बैठकीत आदर्श संसद आदर्श योजनेचा विषय शेवटी ठेवण्यात आला होता. या विषयावर चर्चा करण्याची वेळ येताच समिती अध्यक्ष खासदार मोहिते यांनी हा विषय सर्वांना माहीत आहे, चर्चा नको असे सांगून बैठक संपविण्यास सांगितली. त्यानुसार आदर्श संसद ग्राम या विषयावर बैठकीत चर्चा झालीच नाही.

 
सभागृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष... 
देशभरात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे सुरू आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात शुक्रवारी झालेल्या केंद्रीय योजनांच्या आढावा बैठकीवेळी अस्वच्छता दिसून आली. बैठक आठ दिवस पूर्वीच असल्याचे सांगून सभागृहाची कोणतीही स्वच्छता करण्यात आली नाही. सर्व खुर्च्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती तर अनेक खुर्च्या मोडलेल्या होत्या. स्वच्छता का होत नाही ? असा प्रश्न बैठकीला आलेल्या सदस्य व अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...