आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायीची पहिलीच निवड प्रक्रिया राबवा, उच्च न्यायालयाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया पहिल्या (एक मार्च) प्रमाणे राबवा, असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिला. दुसरी प्रक्रिया (६ मार्च) कोणत्या नियमाने राबवली अशी विचारणा करत ती रद्द करण्यात आली. या निकालामुळे शिवसेनेचे सभापतीपदाचे उमेदवार गणेश वानकर यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे प्रतिवादी भाजपच्या राजश्री कणके यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या निकालानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

 

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी १ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून गणेश वानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात भाजपचे सुभाष शेजवाल हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, अर्ज दाखल करताना गोंधळ झाला. तसेच उमेदवारी अर्जच पळवण्यात आला. 
दरम्यान भाजपकडून राजश्री कणके यांनी अर्ज दाखल केला. पण त्यावर अनुमोदक म्हणून नागेश वल्याळ यांचे नाव हाेते. पण स्वाक्षरी नाही. दरम्यान निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याने हे प्रकरण विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे गेले. त्यांनी अर्ज दाखल करताना गोंधळ झाल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे वानकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक, रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.नव्याने निवडणूक प्रक्रिया न राबविता १ मार्च रोजी सुरू असलेली निवड प्रक्रिया राबवा. 
दुसरी प्रक्रिया राबवत असताना चौकशी करून निर्णय घेणे अावश्यक होते. पण तसे न करता प्रक्रिया सुरू केली. पहिल्याप्रमाणे प्रक्रिया राबवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयात गणेश वानकर, श्रीनिवास रिकमल्ले, सुभाष शेजवाल, नागेश वल्याळ, संतोष भोसले आदी उपस्थित होते. 


अपिलास एक महिन्याची मुदत 
प्रतिवादी यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची मुदत न्यायालयाने दिली. त्यामुळे सभापती निवड प्रक्रिया एक महिन्याने होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात अपिल झाले तर न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंगळवारचा निकाल पाहता शिवसेनेचे गणेश वानकर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 

वानकरच होतील सभापती..? 
न्यायालयाच्या आदेशानुसार आता पहिल्या प्रक्रियेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यात शिवसेनेचे वानकर यांचा एकमेव अर्ज वैध ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे राजश्री कणके यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता आहे. कणके यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत स्थायी समिती सभापती पद रिक्त असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...