आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर: विठ्ठल देवस्थानचा दागिने वितळून विटा करून ठेवण्याचा विचार, राज्य सरकारकडे प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - देशातील विविध देवस्थानांच्या धर्तीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला दान स्वरूपात मिळालेले सुमारे २५ किलोपेक्षा जास्त वजनाचे सोने आणि ८३० किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तू वितळून ठेवण्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा विचार आहे. विविध प्रकारातील हे दागिने हाताळणे समितीला दिवसेंदिवस क्लिष्ट होत आहे.

 

यासंदर्भात प्रस्ताव समितीसमोर आला आहे. मात्र, त्यावर कोणाताही निर्णय झालेला नाही. नित्योपचार समितीशी चर्चा आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच देवाचे पारंपरिक, अतिदुर्मिळ आणि नित्योपचारातील दागिन्यांचा यात समावेश नसल्याचे मंदिर समिती प्रशासनाने सांगितले.

 

हे दागिने हाताळणे, त्यांच्या नोंदी ठेवणे क्लिष्ट झाले आहे. बऱ्याचदा दागिने हाताळताना तुटफूट होत आहे. त्यामुळे देवाच्या अतिदुर्मिळ, पारंपरिक आणि महत्त्वाच्या नित्योपचारातील दागिने सोडून भाविकांनी देवाला अर्पण केलेले इतर दागिने वितळवून त्याची लगड किंवा विटा करून ठेवण्याचा मंदिर समितीच्या विचार आहे. याविषयी मंदिर समितीने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याने १७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्याला अनुकूलता दर्शवत संमती दिली होती. विधी व न्याय विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे सदस्य आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अधिकृत मिंट रिफायनरतीतून हे दागिने गाळपाचे काम करण्याची सूचनाही समितीला दिली होती.

 

दरम्यान, भाविकांच्या भावानांचा विचार करून मंंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीच्या नित्योपचार समितीचा सल्ला घेण्यात येणार आहे. दागिने अधिक सुरक्षित करण्यासाठी ते वितळवून ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

 

सुमारे २५ किलो सोने, ८३० किलो चांदी
गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला विविध प्रकारचे दागिने दान केले आहेत. यात अगदी लहान स्वरूपाच्या मण्यापासून ते सोन्याच्या मुकुटापर्यंतचे विविध प्रकारच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. १९८५ पासून मंदिर समितीकडे २५ किलो सोन्याचे तर ८३० किलो चांदीचे दागिने जमा झाले आहेत. ते उपलब्ध आहेत. सतत त्यांची मोजदाद करावी लागते. त्याचे वजन करून ते सुरक्षितपणे जतन करावे लागतात.

 

श्री विठ्ठल रुक्मिणीस १९८५ पासून भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदीचे दागिने विविध प्रकारात आहेत. त्यांची हाताळणी आणि नोंद ठेवणे सध्या खूपच क्लिष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे दागिने वितळवून त्याच्या लगड किंवा विटा करून सुरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव समितीसमोर आला आहे. या संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून अजून कोणताही निर्णय झालेला नाही. देशातील अनेक देवस्थानांनी अशा प्रकारे दागिने वितळवून ठेवलेले आहेत.  
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती.

 

बातम्या आणखी आहेत...