आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुर: भाविकांना फक्त दर्शनबारीतून तर व्हीआयपींना उत्तर द्वारातून प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पंढरपुरात १३ ते २७ जुलै या कालावधीत आषाढी सोहळा होत आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शन बारीखेरीज मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेशच अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी जारी केले आहेत. 


पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक, वारकरी दर्शनासाठी येत असतात. आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस कायद्यानुसार आदेश लागू करण्यात आले आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाजातून सोडण्यात येणार नाही. आषाढी कालावधीत दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र रांग नाही. भाविकांनी मुख दर्शनानंतर उत्तर दरवाजातूनच बाहेर पडावे. पश्चिम दरवाजासमोरील मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही, याचीही दक्षता भाविकांनी घ्यावी. मंदिराच्या सोळखांबी जवळील उत्तरेकडील दरवाजानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई केली आहे. 


दर्शन बारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे, यासाठी नियोजन करून मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, हे दरवाजे आपत्कालीन प्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील. या आदेशात आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी आदेशात नमूद केले आहे. 


अपर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी काढलेल्या आदेशामध्ये दर्शनासाठी व्हीव्हीआयपी व निमंत्रितांच्या दर्शनाची सोय केली आहे. व्हीआयपी प्रवेशद्वारातून फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिर समितीच्या प्रतिनिधीने खात्री केल्यानंतरच उत्तर दरवाजातून मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे आदेशामध्ये नमूद केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...