आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे: दुहेरीकरणाला विलंब का, वित्त आयुक्तांनीही झापले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पंतप्रधान कार्यालयाने फटकारल्यानंतर सोलापूर विभागातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर येत नाही. दुहेरीकरण व विद्युतीकरणाबाबत वारंवार तक्रारी करूनही काम मार्गी लागत नसल्याने रेल्वे बोर्डचे वित्त आयुक्त ए. के. प्रसाद यांनी थेट दिल्लीहून सोलापूर गाठले. शनिवारी सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर डीआरएम कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आरव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. निधी उपलब्ध असताना कामे गतीने पूर्ण का केली जात नाहीत, असा सवाल उपस्थित करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

 

वित्त आयुक्त ए. के. प्रसाद यांच्यासह मध्य रेल्वेचे वित्त सल्लागार हे दोन दिवसीय सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांनी सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान सुरू असलेल्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अक्कलकोट, नागणसूर व बोरोटी दरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली. अक्कलकोट रोड ते कुलालीचे काम १६ जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण हाेणे अपेक्षित होते. ते अद्याप पूर्ण झाले नाही. या कामासाठी निधीची तरतूद असताना कामे दिरंगाईने का केली जात अाहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुहेरीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी डीआरएम कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डीआरएम यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूरचा दौरा आटोपून ते शनिवारी रात्री पुण्यासाठी रवाना झाले.


मुदत संपली, तरी काम सुरू
सोलापूर विभागात सुरू असलेले रेल्वे मार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. २०१५-१६ साली हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र सुरुवातीपासून या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे गंभीरपणे पाहिले गेले नाही. कधी ठेकेदारकडून विलंब तर कधी प्रकरण कोर्टात जाणे आदी कारणामुळे दुहेरीकरणाचे काम मंद गतीने चालू राहिले. आतापर्यंत मोहोळ ते वडशिंगे तर होटगी ते नागणसूरदरम्यान झाले आहे. अद्याप विभागात जवळपास १५० किमीचे काम राहिलेले आहे. पंतप्रधान कार्यालयाने २०१८ अखेर हे काम पूर्ण करा, असा आदेश दिला आहे. मात्र रेल विकास निगम लिमिटेडने या कामाची मुदत वाढवून घेतली असून 2020 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आता उद्दिष्ट देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...