आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- विमानसेवेत अडथळा ठरत असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीसाठी पर्यायी जागा देण्याबाबत विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण त्यांचा अंतिम अहवाल आम्हाला मिळाला नाही. त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार फ्लाईंग झाेनच्या पाच किलोमीटर परिसरात चिमणी उभारता येणार नाही. कमी उंचीच्या दोन चिमण्या उभारणे शक्य आहे का, याची तांत्रिक बाजू तपासून कारखाना व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. हा अहवाल आणि प्रत्यक्षात चिमणीची स्थिती पाहता यंदाही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता धूसरच वाटते.
विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी पर्यायी चिमणीला जागा देण्याबाबत विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी श्रीवास्तव यांनी ५ व ६ जून रोजी साखर कारखाना परिसराची पाहणी केली होती. पण त्यांनी अद्याप अंतिम अहवाल दिला नाही. प्रथमच विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली आहे. नाईट लँडिंगसाठी कारखान्याच्या दोन्ही चिमण्या पाडाव्या लागणार असल्याचे सांगितले. डे लँडिंगसाठी फ्लाईंग झोनच्या पाच किलोमीटर परिसरात चिमणी उभारता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर पर्याय म्हणून कारखाना व्यवस्थापनाने विमानतळ प्राधिकरणने दिलेल्या मंजुरीच्या उंचीनुसार दोन चिमण्या उभारणे शक्य आहे का, याची तांत्रिक बाजू तपासून निर्णय घ्यावा, असा सल्ला कारखाना प्रशासनाला दिला आहे.
लवादाकडे सर्व्हेची रक्कम भरावी...
भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या निर्णयाविरोधात कारखाना प्रशासनाने लवादाकडे दाद मागितली आहे. चिमणीबाबत निर्णय घेण्यासाठी कारखान्याने लवादाच्या सर्व्हेची फी भरावी, अशाही सूचना केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामुळे चिमणीबाबत अंतिम निर्णय लवकर होईल. याशिवाय कारखाना युनियनने उच्च न्यायालयात चिमणीचे पाडकाम करू नये, यासाठी याचिका दाखल केली आहे. चिमणीचे पाडकाम करण्याच्या आदेशाला स्थगिती असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे, त्यांनी काय अहवाल दिला माहिती नाही. पण जिल्हा प्रशासनाने दिलेला पर्याय तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे. जागा पाहणीनंतर पर्यायी चिमणीसाठी शासनाकडून काय सूचना येतील, हे पाहून पुढील निर्णय घेता येईल.
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर साखर कारखाना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.