आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे २१ महिन्यांच्या खंडानंतर बाजार समिती संचालकांकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी तिसऱ्यांदा माजी आमदार दिलीप माने तर उपसभापतिपदी श्रीशैल नरोळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख गैरहजर तर सहकारमंत्री गटाचे रामप्पा चिवडशेट्टी व आप्पासाहेब पाटील हजेरी लावून परतले. 


निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केली. यानंतर बाजार समिती आवारात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. 


समिती सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता संचालकांची बैठक बोलाविली होती. निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी कामकाजास सुरुवात केली. सभापती पदासाठी दिलीप माने यांचा तर उपसभापती पदासाठी श्रीशैल नरोळे यांचा अर्ज प्राप्त झाला. दिलीप माने यांच्यासाठी सूचक म्हणून बाळासाहेब शेळके तर अनुमोदक म्हणून अमर पाटील, उपसभापती पदासाठी सूचक म्हणून जितेंद्र साठे तर अनुमोदक म्हणून प्रकाश वानकर यांनी सही केली. दुपारी १२.३० वाजता निवडीची प्रक्रिया होऊन सभापती व उपसभापतीची घोषणा करण्यात आली. 


दिलीप माने तिसऱ्यांदा सभापती, नरोळे झाले उपसभापती 
बाजार समिती सभापती व उपसभापती निवडीनंतर जनवात्सल्य निवासस्थानी दिलीप माने व श्रीशैल नरोळे यांचा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे आदी. 


समितीचे २१ महिन्यात सुमारे २१ कोटींचे उत्पन्न 
सोलापूर बाजार समितीमध्ये सभापती माने यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कुंदन भोळे व सुरेश काकडे यांच्याकडे २१ महिने बाजार समिती होती. प्रशासकाच्या काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढल्याचा दावा बाजार समिती सचिव निंबाळकर यांनी केला आहे. २०१७-१८ या काळात बाजार समितीला २१ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला आहे. व्यापाऱ्यांकडून १ हजार ६४ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 


'जनवात्सल्य'वर निर्णय 
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी सोमवारी सकाळी सर्व नूतन संचालकांची बैठक झाली. बैठकीत सभापती व उपसभापती पदाबाबत चर्चा झाली. चर्चेतून दिलीप माने यांना सभापती तर उपसभापती पदासाठी श्रीशैल नरोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीस आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, प्रकाश वानकर, सुरेश हसापुरे, इंदुमती अलगोंडा-पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर सर्व नूतन संचालक सभापती निवडीसाठी बाजार समितीत दाखल झाले. 


सहकारमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊ 
शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवत पुन्हा संधी दिली आहे. आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरते करतो, सहकारमंत्री सोलापूरचे असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेऊन सोलापूर बाजार समितीचा कायापालट करू. शेतकऱ्यांसाठी व बाजार समितीच्या विकासासाठी पणन खात्याच्या ज्या योजना आहेत, त्या बाजार समितीमध्ये राबविण्याचा मानस आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही मदत घेऊन बाजार समितीचा आदर्श कारभार करू, मतदार शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवू.
- दिलीप माने, सभापती, सोलापूर बाजार समिती 


शिंदे म्हणाले, सर्वांना संधी मिळेल 
निवडीपूर्वी सोमवारी सकाळी सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व नूतन संचालकांची बैठक घेतली. बैठकीनंतर सभापती पदासाठी दिलीप माने यांची तर उपसभापती पदासाठी श्रीशैल नरोळे यांची नावाची घोषणा स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी केली. पण निवडीचा कालावधी किती वर्षाचा यावर कोणतेही भाष्य न करता सर्वांनी संधी दिली जाईल, असे सूचक वक्तव्य केले. यामुळे सभापती व उपसभापती निवड किती वर्षांसाठी आहे ? याचे उत्तर बैठकीतील उपस्थित संचालकांनी देणे टाळले. 

बातम्या आणखी आहेत...