आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती पडघम: सहकारमंत्र्यांच्या खेळीनंतर आता विरोधकांची रणनीतीची आखणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या खेळीनंतर काँग्रेस नेत्यांना बाजार समितीची निवडणूक म्हणजे दुरून डोंगर साजरे करण्यासारखी स्थिती झाली अाहे. कोणी मुंबईत, कोणी मराठवाड्यात, कोणी कर्नाटकात ठाण मांडले अाहे. गुन्हे दाखल झाले असले तरी निवडणुकीपासून रोखले जाणार नाही, याचे समाधान काँग्रेस नेत्यांना अाहे. जामिनासाठीही त्यांचा   अाटापिटा चालू अाहे. भाजपविरोधात काँग्रेस अशी मुख्य लढत असली तरी काँग्रेस नेत्यांना भाजपमधील सिद्रामप्पा पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची साथ मिळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे ही निवडणूक सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याची विधानसभेपूर्वीची तयारी असल्याचे चित्र उभे राहिले अाहे. 


बाजार समितीच्या संचालकांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी गैरव्यवहार प्रकरणात बाजार समितीच्या माजी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण सहकार प्राधिकरणच्या नियमानुसार गुन्हे दाखल झालेल्या सर्व संचालकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. इच्छुक संचालकांनी प्राधिकृत केलेल्या सूचकांमार्फत उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. गुन्हा सिद्ध झाला असल्यास त्या संचालक वा उमेदवारास निवडणूक लढविता येणार नाही. 


काँग्रेस व भाजपची हालचाल वाढली
बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर होताच काँग्रेस व भाजपच्या इच्छुकांच्या हालचाली वाढल्या. काँग्रेसचे प्रमुख नेते सोलापुरात नाहीत. यामुळे उमेदवारी निवड व निवडणुकीची बांधणी करण्याचीजबाबदारी सुरेश हसापुरे व बळीराम साठे यांच्याकडे आली आहे. 


बाजार समितीचे गणनिहाय मतदार 
कळमण ६९५४, नान्नज ५९३०, पाकणी ५२५८, मार्डी ५५३१, बोरामणी १०४४०, बाळे ६४२५, हिरज ६६५०, कुंभारी ८७७६, मुस्ती ८८३६, होटगी ९९३९, कणबस ६७५८, मंद्रुप ९०७६, कंदलगाव ८८३९, भंडारकवठे ८४३९, अौराद ८७७४, व्यापारी ११६९, हमाल-तोलार ११०५. 


बाजार समितीत चांगली माणसे यावीत, एवढेच! 
आम्ही एकत्र आलोय. समविचारांनाही सोबत घेत आहोत. त्यांच्या माध्यमातून चांगली माणसं बाजार समितीवर निवडून जावीत, एवढीच अपेक्षा आहे. नाही तरी याच बाजार समितीला घेऊन किती घाणेरडे राजकारण झाले, हे सर्वांनीच पाहिले. ज्यांनी बाजार समिती मोठी केली, त्या वि. गु. शिवदारे, बाबूराव चाकोते, ब्रह्मदेव माने, भीमराव पाटील यांच्या मुला-मुलींवर गुन्हे नोंदवले. आनंदराव देवकते यांचे जावईही यातून सुटले नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. ज्या मुद्द्यांच्या आधारावर हे गुन्हे नोंदवले, त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावर पुढे काय होईल, सांगता येणार नाही. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने चांगली माणसे समितीवर जातील, एवढाच विश्वास वाटतो.
- दिलीप माने, माजी सभापती 

 

संबंधित मंत्र्याबरोबर चर्चा 
गेल्या निवडणुकीत परिस्थिती अन् यावेळच्या स्थितीत फारच मोठा फरक आहे. त्यावेळी आम्ही स्वतंत्र पॅनेलद्वारे निवडणूक लढविली. समविचारी एकत्रित येऊन निवडणूक लढविणार आहोत. संबंधित मंत्री व प्रमुख नेत्यांसोबत बैठका, चर्चा सुरू अाहेत. दोन दिवसांत निर्णय होईल. पण आताचा मतदार फारच सूज्ञ आहे, ते पात्र उमेदवारांनाच संधी देतील.
- बळीराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद 


मी निवडणूक लढवणार नाही 
बाजार समिती निवडणूक मी लढवणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणार आहे. कार्यकर्ते कोठे बोलवतील तेथे जाऊन काम करणार आहे. निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षास पदाधिकारी घेणार आहेत, त्यांच्या आदेशानुसार काम करणार आहे.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 


काँग्रेस एकत्रित येऊन लढणार... 
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविणार आहोत. सर्व माजी संचालक व काँग्रेस नेत्यांना सोबत घेण्याचे नियोजन आहे. निवडणुकीचे सारथ्य आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे दिले आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारांची नावे निश्चित करून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. 
- सुरेश हसापुरे, जिल्हा बँक संचालक. 

बातम्या आणखी आहेत...