आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी भाजपला अनुमोदक नाही, अन्य एक अर्ज कार्यकर्त्यांनी पळवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे सुभाष शेजवाल यांचा अर्ज पळवून नेताना भाजपचे समर्थक. यावेळी नगरसेवक संतोष भोसले, श्रीनिवास करली आदी. - Divya Marathi
भाजपचे सुभाष शेजवाल यांचा अर्ज पळवून नेताना भाजपचे समर्थक. यावेळी नगरसेवक संतोष भोसले, श्रीनिवास करली आदी.

सोलापूर- पक्षांतर्गत वाद, गटबाजीमुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपची स्थायी समिती सभापती निवडणुकीत नाचक्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार राजश्री कणके यांना अनुमोदक मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा अर्धवट अर्ज बाद करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसनेतर्फे गणेश वानकर यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून स्वतंत्र अर्ज दाखल करण्यासाठी आलेले सुभाष शेजवाल यांचा अर्ज सर्वांसमक्ष भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नाट्यमयरीत्या पळवला. गुरुवारी दुपारी तासभर महापालिकेत हा गोंधळ सुरू होता. 


महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी दुपारी दोनपर्यंत होती. भाजपचे आठपैकी सहा सदस्य येण्यास तयार नव्हते. शेवटच्या क्षणी नागेश वल्याळ आले पण अनुमोदक म्हणून त्यांनी सही केली नाही. 


भाजपच्या राजश्री कणके यांचा अर्धवट भरलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण दंतकाळे यांच्याकडे देण्यात आला. अर्ज देत असताना शिवसेनेेने गोंधळ घातला. मला निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवू नये, माझा अर्ज मान्य करावा, अशी मागणी कणके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांच्याकडे केली. शिवसेनेचे वानकर यांचा अर्ज वैध ठरण्याची शक्यता आहे. कणके यांना शनिवारी सकाळपर्यंत थांबा व पाहाची भूमिका घ्यावी लागणार आहे. अर्ज दाखल प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारुड यांनी मागवले आहे. भाजपचे सुभाष शेजवाल यांचाही अर्ज पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर पळवला. 


स्थायी समिती सभापतीसाठी कणके यांचे नाव निश्चित झालेले असताना सहकारमंत्री गटाच्या सहा नगरसेवकांनी त्याला विरोध केला. शेजवाल हे स्वतंत्र अर्ज दाखल करणार होते. त्यांचा अर्ज पळवण्यात आला. कणके यांचा अर्धवट अर्ज नगरसचिव दंतकाळे यांनी स्वीकारला. वल्याळ यांनी भारुड यांची भेट घेऊन तक्रार केली. मी वेळेत तेथे असताना मला सही करू देण्यात आली नाही. यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहावे, अशी मागणी त्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तेथे असलेल्या कॅमेऱ्यातील चित्रण एकत्रित करून अहवाल तयार करण्याचे आदेश भारुड यांनी नगरसचिव दंतकाळे यांना दिले. त्यावर शनिवारी निर्णय होणार आहे. 


भाजपची नाचक्की, सेनेचा जल्लोष 
भाजपमधील दोन गटांतील वाद पाहता आठ सदस्य असलेल्या भाजपला अनुमोदक मिळत नसल्याने पक्षाध्यक्ष, सभागृह नेता हतबल झाले आहेत. भाजपला अनुमोदक न मिळाल्याने शिवसेनेचा मार्ग सोपा झाला आहे. शिवसेनेने मनपा आवारात जल्लोष केला. 


शनिवारी निवड
शिवसेनेचे वानकर, भाजपच्या कणके यांचे अर्ज दाखल झाले. छाननी शनिवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कणके यांच्या अर्जावर अनुमोदकाची सही नसल्याने शिवसेना हरकत घेणार आहे. गरज भासल्यास पुन्हा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. 


विरोधक एकत्र 
राजश्री कणके यांचा अर्ज वैध ठरला तर मतदान होईल. त्यात भाजप आणि विरोधकांकडेही प्रत्येकी आठ मतदान आहेत. समान मते झाल्यास चिठ्ठीद्वारे निवड होईल. 

बातम्या आणखी आहेत...