आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षात १६४ कोटींची कामे सुचवलीच नाहीत; तरीही बिले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात मागील चार वर्षात २०० कोटींपेक्षा जास्त रक्कम भांडवली निधीतून खर्च झाल्याचे मक्तेदारांच्या देणीवरून दिसून येते. इतकी रक्कम अंदाजपत्रकात तरतूद नसताना खर्च केल्याचे पुढे आले आहे. तसेच मक्तेदारांना चालू वर्षात ५२ कोटींची देणी देऊनही १६४ काेटी थकीत कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


मक्तेदारांचे १६४ कोटी थकल्याने ते कामे घेत नाहीत. या मुद्द्यावर महापौर शोभा बनशेट्टी यांनी बैठक घेतली. बिलांबाबत खात्री करण्यासाठी मक्तेदारांकडून थकीत बिलाची यादी मागवण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, विनायक विटकर, मनपा मुख्य लेखापरीक्षक शिरीष दुनाके, मक्तेदार संघटनेचे सूर्यकांत भोसले, अनिल गवळींसह सुमारे १०० मक्तेदार उपस्थित होते. 


काही ठरावीक मक्तेदारांना बिले अदा केली जातात. देखभाल व दुरुस्ती, पाणी, दिवाबत्तीची बिले अदा केली. त्यामुळे इतर काम करणाऱ्या मक्तेदारांना बिले दिले जात नाहीत, असा सूर बैठकीत निघाला. मक्तेदारांच्या १६४ कोटी देणीवर कोळी आणि कोठे यांनी प्रश्न उपस्थित केला. १५० कोटींपेक्षा जास्त निधी दिलेला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यात काही तर अनियमितता आहे. त्यामुळे यांची तपासणी होणे आवश्यक आहे. मक्तेदारांनी थकीत रकमांची यादी द्यावी. त्यांची तपासणी करून रक्कम निश्चित करावी. याबाबत पुढील आठवड्यात आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. 


४७७ कोटी देणे (आकडे कोटीत) 
मनपा सेवक ११०, प्राथमिक शिक्षण मंडळ सेवकांचे देय रक्कम २, भूसंपादनासह प्रशासन देणे ८, शासनाचे अनुदानासाठी मनपा हिस्सा ३० टक्के प्रमाणे ५९, अमृत व नगरोत्थान अनुदान मनपा हिस्सा २५, स्मार्ट सिटी मनपा हिस्सा ८०, शासकीय कर्ज देय रक्कम २७, मक्तेदारांची देणी १६४. एकूण ४७७ कोटी देणे लागते. 


दरमहा २३.७० काेटी लागतात 
महापालिकेस दरमहा २३.७० कोटी रुपये आवश्यक असून त्यात सेवक वेतनासाठी ११.५ कोटी तर पेन्शन ३.६ कोटी, लाइट बिल ३.५ कोटी, पाणी बिल २५ लाख, शिक्षण मंडळ वेतन १ कोटी, परिवहन साह्य ५५ लाख, एमजेपी २५ लाख, पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा रक्कम १.२५ कोटी, इतर अत्यावश्यक खर्च ५० लाख, घंटागाडी मानधनावरील सेवकांचे बिल १ काेटी.

बातम्या आणखी आहेत...