आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्री विनोद तावडे ठरले शिक्षक निवडणुकीत ‘नापास’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जनता दलाचे कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. शक्ती पणाला लावूनही त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एकूण, या निवडणुकीत शिक्षणमंत्री नापास ठरले आहेत.   


तावडे व पाटील यांचे वैर सर्वश्रुत आहे. परिषदेत दोघेही १० वर्षांपासून आहेत व सभागृहात एकमेकांना अडवण्याची व नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नसतात. तावडेंच्या विभागाचे खासगी विद्यापीठ, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांचे विधेयक पाटील यांनी अडवून धरले होते. कंपनीच्या शाळेचे विधेयक पाटील यांच्यामुळे वरच्या सभागृहात अडले आहे. आघाडी सरकारच्या काळात मुंबईत शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेत होत. तावडेंनी ते भाजपच्या अधिपत्याखालील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नेले. त्याविरोधात पाटील सर्वोच्च न्यायालयात गेले व तो निर्णय रद्द केला. पाटील यांचे उट्टे काढण्याची संधी तावडेंनी घेतली. मुंबई शिक्षक मतदारसंघात त्यांनी जातीने लक्ष घातले. हा मतदारसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत शिक्षक परिषद संघटनेचा हक्काचा. पण शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावली. पाटील यांच्याप्रमाणे शिक्षक संघटनेत कार्यरत असलेले, पण भाजपचा काही संबंध नसलेले अनिल देशमुख यांना उभे केले. 

 

तावडे विरोधी पक्षनेते असताना पाटीलही विरोधी बाकावरच होते. त्यांच्यात तेव्हाही संवाद नव्हता. तावडे ‘अभाविप’ मधून आलेले, तर पाटील राष्ट्र सेवा दलात घडलेले. सभागृहात एक उभा असला की दुसरा खाली बसून शेरेबाजी करणारच,  हे अनेक वर्षांचे सभागृहातले चित्र आहे. तावडेंनी ३, तर पाटील यांनी परिषदेचे २ कार्यकाळ पूर्ण केले.  तावडेंच्या प्रत्येक निर्णयावर पाटील यांच्या संघटनेचा विरोध ठरलेला असतो. तावडेंविरोधात या संघटनेची शेकडो आंदोलने झाली.  तावडेंनी माझ्या पराभवासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग केला. शिक्षण संस्थांवर दबाव टाकला. सरकारी यंत्रणा वापरली, असे गंभीर आरोप पाटील यांनी या निवडणुकीत केले हाेते. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय न राहता ‘तावडे विरुद्ध पाटील’ अशीच झाली होती.   

 

सरकारच्या ४ वर्षांच्या काळात भाजपमध्ये तावडे बॅकफूटवरच आहेत. त्यांच्या खात्याचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यात मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपयशाने ते आणखी बॅकफूटवर गेले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...