आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, हक्काच्या पाण्याची तरतूद हवी; कल्याणराव काळे यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुल- उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे, सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत आदी मागण्यांसाठी भीमा नदीकाठ बचाव संघर्ष समितीने गुरुवारी (दि.२४) सकाळी १० वाजता सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर येथे ) रास्ता रोको केला. दीड तासाच्या या आंदोलनामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन   दिल्यानंतर हे आंदोलन थांबवले. दरम्यान, पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही. दिसतील तेथे घेराव घालून जाब विचारू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांंनी दिला. 


प्रकटनातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे वगळल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. महिनाभरापासून नदीचे पात्र कोरडे आहे. पिकांचे नुकसान होत आहे. नदीकाठच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी बेगमपूर चौकात रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका गोडसे यांनी घेतली. अखेर कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी निवेदन स्वीकारले. तसेच २९ मे ते दोन जून का काळात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. 


आंदोलन मोडीत काढण्याचा डाव 
शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात आल्यानेच वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नदीला पाणी सोडणार, असे सांगून संभ्रम निर्माण करत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा हा कुटील डाव आहे. मात्र, आमचा लढा थांबणार नाही. आता नदीला पाणी तर सोडावेच लागेल. पण कायमस्वरूपी पाणी सोडण्याचीही तरतूद झाली पाहिजे, असेही काळे म्हणाले. 


शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही 
पंढरपूर- उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याविषयी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ताळमेळ नाही. जनजागृतीमुळे आता शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसताच ते पाणी सोडण्याची भाषा करत आहेत. मात्र, प्रकटन दुरुस्तीला जाणीवपूर्वक फाटा दिला जात आहे. आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, नदीत कायमस्वरूपी पाणी सोडण्याची तरतूद हवी. अन्यथा शांत बसणार नाही, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख कल्याणराव काळे यांनी दिला. गुरुवारी येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्था सभागृहात भीमा नदीत पाणी सोडण्याच्या प्रकटन दुरुस्तीप्रश्नी शुक्रवारी तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 


काळे म्हणाले, गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले होते. नदीकाठच्या शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास या पाण्याचा हिशेब घेऊ. दोन्ही कालव्यांना पाणी मिळालेच पाहिजे. सर्व बंधाऱ्यांना फायबरचे दरवाजे बसवून गळती थांबवावी, कृषीपंपांसाठी उच्च दाबाने आठ तास वीज मिळावी. प्रकटीकरणात वेळीच दुरुस्ती न झाल्यास भविष्यात नदीकाठ वाळवंट होईल. नदीचे पाणी इतरत्र वळवण्याची प्रशासनाची कुटनीती आहे. याविरोधात संघर्ष सुरू आहे. नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती सुरू आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून संघर्षासाठी सज्ज राहा. मोर्चात शेतकऱ्यांनी ताकद दाखवावी. 


यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू यलमार, महादेव देठे, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर चव्हाण, मोहन नागटिळक, अण्णा शिंदे, युवराज दगडे, तानाजी सरदार, इब्राहिम मुजावर, विलास जगदाळे, उत्तम नाईकनवरे, तुकाराम माने, शेखर भोसले, शंकर कवडे, रामभाऊ कौलगे, पांडुरंग कौलगे, कुलदीप कौलगे, रमेश नागणे, बाळासाहेब काळे, नारायण शिंदे, जयसिंह देशमुख, बिभीषण पवार, मारुती भोसले, सोमनाथ गोरे, गणेश ननवरे, नितीन पवार उपस्थित होते. 


'शेतीचा विचार करा' 
केवळ सोलापूर शहराचा पाणीपुरवठा डोळ्यासमोर ठेवून नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. तोपर्यंत नदीकाठच्या पिकांना मोठा फटका बसतो. यापुढील काळात नदीकाठाचे शेतकरी आणि शेतीचा प्राधान्याने विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन झाले पाहिजे, असेही शैला गोडसे म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...