आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू माध्यम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षक, विद्यार्थी समायोजनाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरखेड - येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत परिसरातील अन्य जि.प. उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे समायोजन करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होणारा खेळखंडोबा थांबवावा, अशी मागणी शिरखेडसह परिसरातील पालिकांनी केली असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

 

येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद उर्दू शाळा असून एकूण ८८ विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करत आहेत. मात्र पहिले ते आठवीपर्यंत शाळा असलेल्या या शाळेचा भार एका मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांच्या खांद्यावर आहे. दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थी व वर्गांच्या तुलनेने शिक्षकांची संख्या तोकडी आहे, तर दुसरीकडे परिसरातच उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या अन्य शाळा असून या शाळांमध्ये केवळ ८ ते १० विद्यार्थी शिक्षण घेत असून अध्यापन कार्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा एकंदरीत विचार करता शिक्षण विभागाने येथून ६ ते ८ किमी. अंतरावर असलेल्या अन्य जि.प. उर्दू शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे शिरखेड येथील शाळेत समायोजन करावे.


तसेच समायोजित केलेल्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शिक्षण विभागाने बस द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांमुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक पुरेसे असतील. येथील शाळेत शिक्षण विभागाने एका शिक्षकाची नियुक्ती केली. मात्र त्याला अमरावती येथे संलग्न केले. इयत्तांच्या तुलनेत शिक्षकांची असलेली तोकडी संख्या पाहता विद्यार्थ्यांना शिकवताना मुख्याध्यापकासह अन्य दोन शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची मागणीही पालकांकडून होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...