आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेलिलाव: आयुक्तांची दिशाभूल, पालकमंत्री हात बांधलेले; मग शहर पेटणारच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - "महापालिका आयुक्त दिशाभूल करतात तर पालकमंत्री कायद्याने हात बांधले असल्याचे सांगतात. अशा स्थितीत आमच्या समोर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. एक तर सोलापूर पेटत नाही अन् पेटले की विझत नाही, हा इतिहास आहे. त्याची आता जाणीव करून द्यावी लागेल," अशा शब्दांत गाळेधारकांनी शनिवारी गंभीर इशारा दिला. सोमवारी कुटुंबीयांसह महापालिकेवर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले. त्यालाही न जुमानता ई-निविदा प्रणाली प्रक्रिया सुरू केली तर त्याला कोणीच दाद देणार नाहीत, असेही म्हणाले.

 

महापालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. समिती अध्यक्ष अशोक मुळीक, माणिक गोयल, गुलाब बारड, दीपक मुनोत, विजय पुकाळे आदी या वेळी उपस्थित होते. या सर्वांनी आयुक्त आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तोंडसुख घेतले. पालकमंत्री कालपर्यंत आमच्या बाजूने होते, आज अचानक कायद्याची भाषा करतात. एलबीटीविरोधातील संघर्षाच्या वेळी कायदा नव्हता काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

महापालिकेने बांधलेल्या व्यापारी संकुलातील मेजर व मिनी गाळ्यांची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या गाळ्यांचा लिलाव करून बाजारमूल्याप्रमाणे भाडे आकारणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला आहे. बाजारभावाच्या तुलनेत भाडे खूप कमी आहे, अनेकांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत, असे निरीक्षणास आल्यानंतर प्रशासनाने लिलावाची प्रक्रिया सुरू केली. व्यापाऱ्यांनी धरणे दिल्यानंतर शिष्टमंडळाशी चर्चाही केली. लिलावात आलेल्या नव्या दराप्रमाणे भाडे देण्यास राजी झाल्यास मूळ गाळेधारकास प्राधान्य देण्याचे धोरण महापालिका आयुक्तांनी जाहीर केले. मात्र, गाळेधारकांचे समाधान झाले नाही. लिलावास त्यांचा विरोध आहे.

 

पोटभाडेकरूंविरुद्ध थेट कारवाई कराच
गाळ्यांची भाडेवाढ करा म्हणून २०११ पासून महापालिकेच्या मागे व्यापारी लागले. परंतु आजतागायत त्याला दाद मिळाली नाही. गेल्या आठ महिन्यांपासून भाडे घेतले नाही. आता ई-निविदा भरताना मागील महिन्याच्या भाड्याची पावती भरणे अनिवार्य आहे. हा काय प्रकार आहे? व्यापारी संकुलांमध्ये कसल्याही सुविधा नसतानाही अाम्ही भाडेवाढ द्यायला तयार आहोत. परंतु त्यांना हुसकावून लावण्याचेच प्रकार दिसून येतात. पोटभाडेकरूंचा विषय सांगतात. त्याची आकडेवारी चुकीची आहे. ज्यांनी पोटभाडेकरू ठेवले, त्यांच्यावर थेट कारवाई करा. दोन-चार लोकांसाठी आम्हा सर्वांना वेठीस धरू नका.
- अशोक मुळीक, अध्यक्ष, गाळेधारक व्यापारी संघर्ष समिती

 

उद्या निघणाऱ्या मोर्चात कामगारांची कुटुंबेही
सोमवारी पारस इस्टेटपासून निघणाऱ्या माेर्चात व्यापारी कुटुंबांसह सहभागी होतीलच, शिवाय दुकानांतील कामगार मंडळींची कुटुंबेही येणार आहेत. कारण चौदाशे गाळ्यांमध्ये सुमारे ७ हजार कामगारांची उपजीविका आहे. प्रत्येक व्यापाऱ्यांचे एक गुडविल आहे. त्याच जोरावर त्यांचा व्यापार चालतो, लोकांना रोजगार मिळतो. अशा स्थितीत व्यापाऱ्यांना स्थैर्य देण्याचे सोडून त्यांना हुसकावण्याचे प्रकार होत आहेत. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी हा मोर्चा आहे. त्यात सामान्य नागरिकही आम्हाला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे. बेरोजगारांना गाळे मिळालेच पाहिजे. त्यासाठी नवीन संकुले बांधावीत.
- केतन शहा, व्यापारी

बातम्या आणखी आहेत...