आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांनी सांगून महिना लोटला, 'डीसीसी'त पैशाचा भरणा नाही! जे भरू म्हटले, ते पदावर जाऊन बसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवाची सांगता गेल्या महिन्याच्या ३० तारखेला मोठ्या धुमधडाक्यात झाली. सर्व संचालकांचे नेते शरद पवार आले. बँकेच्या आर्थिक स्थितीवर मार्मिक भाष्य करीत थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वाक्याला आज महिना झाला, पण नया पैशाची थकबाकी वसूल झाली नाही. नेत्याचे खडे बोल ऐकून ज्यांनी, थकबाकी भरण्याची सुरुवात माझ्यापासून म्हटले, त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जाऊन बसले. त्या पलीकडे काहीही झालेले नाही. 


दुसरीकडे बँकेने गत आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडला. त्यात अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) ४० टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले. कर्जमाफीची रक्कम मिळूनही बँकेचा तोटा वाढला, त्याचे मुख्य कारण शेती कर्जाची वसुली यंदा फक्त १४ टक्के झाली. सरसकट कर्जमाफी मिळण्याच्या आशेने शेतकरी कर्ज भरले नाहीत. बड्या थकबाकीदारांचे तर बँकेच्या स्थिती-गतीशी काही संबंधच नाही. करमाळा, बार्शी, अक्कलकोट, माढा, दक्षिण सोलापूर, पंढरपूर या सधन पट्ट्यातच सर्वाधिक थकबाकी अडकून पडलेली आहे. एकूणच वसुलीबाबत विचारले असता, बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले, ज्यांनी भरण्याची सुरुवात माझ्यापासून म्हटले त्यांनाच विचारा.

 

जबाबदारी निश्चित होणार, २४ जूनला सुनावणी 
नियमबाह्य कर्जे वाटल्याने बँकेला किती आर्थिक नुकसान झाले, याची चौकशी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी केली. सहकार कायदा १९६० च्या कलम ८३ अन्वये ही चौकशी पूर्ण करून त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम ८८ ची अन्वये चौकशी करण्याची शिफारस केली. त्याला संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. त्यावर शासनाने म्हणणे दिले नव्हते. परंतु २८ मार्च २०१८ रोजी शासनाने स्थगिती उठवण्याची याचिका दाखल केली आहे. त्यावर २४ जूनला सुनावणी होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली. 


केवळ ३५ शाखांमध्येच ७४० कोटींची थकबाकी 
अनुत्पादक कर्जाच्या प्रमाणाची आकडेवारी बँकेने जाहीर केली. त्यात एकूण ८६४ कोटी ७१ लाख रुपयांच्या थकबाकीपैकी ३५ शाखांकडेच ७४० कोटी ९० लाखांची थकबाकी आहे. २०१६ च्या तुलनेत गत आर्थिक वर्षात एनपीएमध्ये ६५ कोटी ८१ लाख रुपयांची वाढ झाली. शिवाय २८१ कोटी रुपयांनी कर्जवाटपही कमी झाले. शेतीकर्जे न भरणाऱ्यांची संख्या बार्शीत सर्वाधिक आहे. तालुक्यातील चार शाखांमध्ये २०५ कोटी ४५ लाखांची थकबाकी आहे. सर्वात कमी एनपीए मोहोळमध्ये असून, त्याचे प्रमाण १२ कोटी आहे. 

बातम्या आणखी आहेत...