आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतिपदासाठी इच्छुक नाही; शेतकरीविरोधी निर्णय रोखू; पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही एकत्र आलो अाहोत. शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध निर्णय घेतल्यास विरोध करणार, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. तसेच सभापतिपदासाठी इच्छुक नाही. विधानसभा मतदारसंघातील व्यापारी व हमाल वर्गाच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी कोंडी ग्रामस्थांच्या वतीने बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. यावेळी सामान्य शेतकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


या वेळी माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, शिवसेना नेते दीपक गायकवाड, नूतन संचालक प्रकाश वानकर, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, पांडुरंग गवळी, पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे, लहू गायकवाड, शिवाजी ननवरे, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने आदी उपस्थित होते. 


संजय शिंदेंच्या हस्ते पालकमंत्री, माने यांचा सत्कार 
सोलापूर बाजार समितीची सत्ता मिळवल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख व माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सत्कार केला. त्यांच्यात दोन तास जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चाही झडली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात एकजूट ठेवण्याचा निर्धार या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजले. 
या निकालाने आगामी काळात सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीची चिन्हे दिसू लागली आहेत. रविवारी काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घरी उमेश परिचारक आले. या वेळी सुरेश हसापुरे उपस्थित होते. त्यांच्या पराभवाचा आम्हालाही चटका लागल्याचे सर्वांनी मान्य केले. सभापती व उपसभापतिपदासाठी १३ तारखेला बैठक होणार असल्याची माहिती मिळाली. 


कोण काय म्हणाले... 


सत्तेमुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख हवेत होते. मात्र, लोकांनी त्यांची जिरवली. प्रामाणिक काम केले म्हणून आम्हाला निवडून दिले.
-  दिलीप माने, माजी आमदार 


सहकारमंत्री देशमुख यांच्यामुळे आम्हाला बाजार समितीच्या संचालकपदी संधी मिळाली. दिलीप माने यांनी शिवसेनेला पॅनेलमध्ये घेतले.
- प्रकाश वानकर, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना 


सर्व पक्षातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्यास चित्र वेगळे दिसेल. सहकारमंत्री यांच्या कारवाईमुळे आम्हाला लोकांची सहानुभूती मिळाली.
- बळीराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद 

 

बातम्या आणखी आहेत...