आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड मोहिमेबाबत जिल्हा परिषद यंत्रणा ढिम्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड अभियान अंतर्गत जुलै महिन्यात जिल्हा परिषदेस तब्बल पाच लाख १४ हजार ५०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. पण, १३ दिवसांमध्ये फक्त सात टक्के रोपांची लागवड झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे वृक्षलागवड अभियानाकडे सोईस्कर दुर्लक्ष झाले आहे. 


हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत यंदाच्यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. एक ते ३१ जुलै दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे १०२९ ग्रामपंचायतींमध्ये पाच लाख १४ हजार ५०० रोपे लावण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात वृक्षलागवड अभियानाकडे दुर्लक्ष झाले आहे. नऊ जुलैपर्यंत जिल्ह्यात फक्त ३६ हजार ६७२ रोपे लावण्यात आलीत. माळशिरस तालुक्यात एकही झाड लागले नाही. पालखी सोहळ्यात पंचायत समितीची यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण प्रशासनातर्फे पुढे करण्यात आले. राज्यभरातून येणाऱ्या संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्या पंचायत समितीने पालखीच्या व्यस्त नियोजनातून सहा हजार रोपे लावली आहेत, हे विशेष. 


एक जुलैपासून अभियान सुरू झाले. पण, पदाधिकारी- अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन वृक्षलागवड अभियानासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र नाही. शासनाच्या अनेक योजनांपैकी प्रामुख्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या अजेंड्यावरील योजना राबविण्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचा विशेष कल असल्याचे चित्र आहे. सध्या बंदिस्त गटार अभियान राबविण्यात सीईआेंची यंत्रणा व्यस्त आहे. 


गेल्या दोन वर्षामध्ये झेडपी व पंचायत समितीतर्फे ग्रामीण भागात किती झाडं लावली? त्यापैकी किती झाडं जिवंंत आहेत? याबाबतचा आढावा घेण्याची तसदी जिल्हा परिषदेने घेतली नाही. रोपं लावण्यासाठी खड्डे खोदाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा लाखोंचा निधी खर्ची पडला आहे, याचा विसर झेडपीला पडला आहे. 


गतिमान करण्याच्या सूचना दिल्या 
वृक्ष लागवड अभियानचे उद्दिष्ट प्रत्येक तालुक्यांना दिले आहे. खड्डे खोदण्यात आले असून सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपे मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकसहभागातून वृक्षलागवड अभियान गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- चंचल पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग 

बातम्या आणखी आहेत...