आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ सहा हजार प्लेटलेट्स; तरीही ते करतात 10 तास काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनुष्याच्या शरीरात निरोगी आयुष्यासाठी सरासरी दीड लाख प्लेटलेटस असणे गरजेचे असते. प्लेटलेट्स कमी झाल्यास आरोग्य बिघडते. लाखाच्या आत प्लेटलेटस आल्यास मनुष्याच्या नाका-ताेंडातून रक्त येऊ लागते. शिवाय त्याला बेडवरच राहावे लागते. पण आरोग्याच्या या नियमाला धक्का देत शरीरात केवळ सहा हजार प्लेटलेट्स असताना एक माणूस सर्वसाधारण आयुष्य जगत असून दररोज दहा तास बँकिंग क्षेत्रातील किचकट काम करत आहे. मेडिकलच्या भाषेत याला लाखातील एक केस मानण्यात येते.

 

केवळ सहा हजार प्लेटलेटसवर जगणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत चोळके आहे. ते विदर्भ कोकण बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स सरासरी ४ ते १२ हजार असेच राहिले आहे. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जीवावर चोळके यांचा जीवनसंघर्ष सुरू आहे. सी-आयपीटी(C-IPT) असे या आजाराचे नाव आहे. या आजारात सातत्याने प्लेटलेटस कमी होत जातात. नोव्हेंबर २०१४ मध्ये चोळके यांना बोलताना धाप लागणे, अशक्तपणा आदी लक्षणे दिसू लागली. त्यांनी सोलापुरातील एका नामांकित डॉक्टरांना दाखविले. उपचारानंतर त्यांना हिमोटोलॉजिस्ट या तज्ज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला देण्यात आला.

 

विशेष म्हणजे सोलापुरात हिमोटोलॉजिस्ट तज्ज्ञच नाहीत. त्यामुळे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील हिमोटोलॉजिस्ट डॉ. समीर मेलिनकेरी यांना दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेबुवारी २०१५ पासून उपचार सुरू करण्यात आले. प्लेटलेटस वाढविण्यासाठी १० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतची अनेक औषधे त्यांनी घेतली. टप्याटप्याने उपचार करण्यात येत आहे. प्लेटलेटस वाढत नसल्यातरी चोळके यांचे जीवनमान स्थिर आहे. पण सातत्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागते. दहा हजारच्या आत प्लेटलेट्स आल्यास माणसाची जगण्याची शाश्वती नसते. मध्यंतरी अमेरिकेतील एका कंपनीत चोळके यांचे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्रयोग केला. पण, तो यशस्वी होऊ शकला नाही. मेडिकलची गृहितके बाजूला ठेवून जगत आहेत.

 

नियमित औषध, प्राणायामचा आधार
डॉक्टराच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार सुरू आहे. दर महिन्याला तपासणीसाठी पुण्याला जातो. शिवाय दररोज नियमित योग, प्राणायाम आणि योग्य आहारामुळे या आजाराशी लढण्याची ताकद मिळते. कितीही गंभीर आजार असला तरी हिंमत न हारता लढत राहिले पाहिजे, असे चंद्रकांत चोळके सांगतात.

 

आजारामुळे प्लेटलेट्स लगेच नष्ट होतात
चोळके यांची प्लेटलेट्स कमी होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यांचे बोनमॅरो व्यवस्थित आहे. औषधे त्यांना लागू होत नाहीत. त्यांच्या शरीरात प्लेटलेट्स लगेच नष्टही होतात. मेडिकलमधील लाखातील एक दुर्मिळ केस म्हणता येईल.
- डॉ. समीर मेलिनकेरी, हिमोटोलॉजिस्ट, पुणे

 

बातम्या आणखी आहेत...