आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर : वशिल्याच्या व्हीआयपी दर्शनासाठी सदस्याची कर्मचाऱ्याला शिवीगाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- बंद असलेल्या व्हीअायपी दर्शनासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ  मंदिरातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सकाळी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. नंतर मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने व सदस्य अधटराव यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या वादावर पडदा पडला.    


सध्या आषाढी यात्रेमुळे मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे. तरीही मंदिर समितीचे सदस्य  अधटराव यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चार ते पाच भाविकांना सोडण्याची मागणी सीसीटीव्ही कक्षातील सावता हजारे यांच्याकडे केली. त्यांनी व्हीआयपी दर्शन असल्याने सोडता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधटराव आणि हजारे यांच्यात तू तू मै मै झाली. अधटराव यांनी हजारेंना शिवीगाळ केल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. त्यामुळे  मंदिरातील कर्मचारी संतप्त झाले.  त्यांनी काम बंद आंदोलन पुकारुन येथील लाकडी सभामंडपात जमले. ‘नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, हमसब एक है’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. सुमारे एक तासभर या कर्मचाऱ्यांनी  ठिय्या मारला होता. मंदिर   समितीतील अनेक सदस्य वशिल्याच्या दर्शनासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात. मनात नसतानाही अशा सदस्यांच्या लोकांना दर्शनासाठी सोडावे लागते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.    


त्यावर समितीचे अधिकारी सचिन ढोलेंनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी अधटरावही  तेथे दाखल झाले. कर्मचाऱ्यांची तसेच अधटराव यांची बाजू कार्यकारी अधिकाऱ्यांनी एेकून घेतली. अधटराव यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

बातम्या आणखी आहेत...