आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या महिला डब्यात पॅनिक बटण, तत्काळ मदत मिळणार; सर्व डब्यांत सेवेचा विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आता रेल्वेतून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षितरीत्या इच्छितस्थळी पोहोचता येईल. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची असुरक्षितता जाणवली तर रेल्वेकडून तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकेल. प्रायोगिक स्तरावर महिलांच्या डब्यात पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे.

 

ही सुविधा पूर्वी केवळ मुंबई उपनगरीय रेल्वेसेवापुरतीच मर्यादित होती. मात्र, आता रेल्वे मंत्रालयाने या सुविधेचा विस्तार करुन ती देशातील सर्व मेल एक्स्प्रेस व सुपरफास्ट दर्जाच्या गाड्यांना जोडण्यात आलेल्या महिला डब्यांतही लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शयनयान व वातानुकूलित दर्जाच्या डब्यातही पॅनिक बटण बसवण्याचा रेल्वे मंडळाचा विचार आहे. रेल्वे मंत्रालय २०१८ या वर्षात “महिला व बालकांच्या सुरक्षा’ हा संकल्पनेवर काम करत आहे. या अंतर्गत महिला प्रवाशांना सुरक्षा पोहोचवण्यासाठी यापूर्वी महिलांचे डबे रेकच्या मध्यभागी जोडणे व त्यांना गुलाबी रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता सर्वच महिलांच्या डब्यात पॅनिक बसविण्याचा निर्णय झाला आहे. 

 

कसे काम करेल 
महिलांची छेडछाड होत असेल तर त्यांनी तत्काळ डब्यातील पॅनिक बटण दाबावे. बटण दाबल्यानंतर याची माहिती तत्काळ रेल्वेच्या गार्डला कळेल. गार्ड लगेच वॉकीटॉकीवरून याची माहिती गाडीतील आरपीएफ जवानांना व तिकीट पर्यवेक्षकांना देईल. आरपीएफ जवानांना माहिती मिळाल्यानंतर ते लगेच डब्यात पोहोचून महिलेस मदत करतील. 

 

सर्व डब्यांत सेवा देण्याचा विचार 

सुरुवातीला महिलांच्या डब्यात प्रायोगिक तत्त्वावर पॅनिक बटण बसवले जाणार आहेत. त्यानंतर सर्व दर्जाच्या म्हणजेच जनरलपासून प्रथम श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यांपर्यंत प्रत्येकांत ही सुविधा दिली जाईल. या संदर्भात मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

आगामी बैठकीत होणार निर्णय 
महिलांच्या डब्यात पॅनिक बटण बसवण्याचा निर्णय झाला. हे बटण डब्यांचे उत्पादन होताना बसवायचे की वर्कशॉपमध्ये आल्यानंतर याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मे महिन्याच्या अखेरीस यासंदर्भात रेल्वे बोर्डात बैठक होणार अाहे. 
वेदप्रकाश, महासंचालक, जनसंपर्क विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.

बातम्या आणखी आहेत...