आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिजापर शहराचा मुख्य रस्ता गेला खड्ड्यात, नागरिक त्रस्त; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरारजी चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सौंदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. मुख्य मार्ग खड्ड्यांनी व्यापला असून, रस्ता कुठेही दिसत नाही. दिसतात ते फक्त खड्डे. त्यामुळे रस्ता गेला खड्ड्यात अशी म्हणण्याची वेळ मूर्तिजापुरकरांवर आली आहे.

 

मूर्तिजापूर शहराच्या मुख्य मार्गाचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून, नागपूर येथील कंपनी हे काम करत आहे. परंतु, सदर कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तर दुसरीकडे शहरवासी तसेच विद्यार्थ्यांना येण्या- जाण्या करिता जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे खड्डयांमध्ये अदृश्य झाला असून, या गंभीर बाबीकडे काही दिवसांपूर्वी अपघात होऊन एका निरपराध मुलीला आपला हात गमावण्याची वेळ आल्यानंतरदेखील झोपेत असलेल्यांची झोप उडालेली नाही. त्यामुळे शहरातील जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे. या रस्त्यावरून ऑटो रिक्षा, मोटारसायकल, चारचाकी वाहन, सायकलने तर सोडा पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. दमदार पाऊस सुरू असून, जागोजागी, पावलोपावली असलेल्या खड्ड्यांमधे पाणी भरत असल्याने वाहन जाताना-येताना पायी चालणारे अथवा सायकल मोटारसायकलवर जाणारे यांच्या अंगावर घाण पाणी उडत असून, या खड्ड्यांमुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर मागे एका विद्यार्थिनीचा अपघात झाल्यानंतर जड वाहनांना प्रवेश बंदी केली असली तरी ती फक्त नावापुरती आहे.


पोलिस विभाग सुस्तपणे आपलं काम करण्यात दंग असून, फक्त प्रवेश बंद बोर्ड लावून हात झटकून शहर पोलिस स्टेशन मोकळे झाल्याचे चित्र या मार्गावर जड वाहने अद्यापही जाणे-येणे करत असल्याने दिसून येत आहे. २६ कोटींचा प्रकल्प असलेल्या ८० फुटी या रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरारजी चौकापर्यंत रुंदीकरण व सौंदर्यीकरण करण्याचे ८० फूट रस्त्याचे काम नागपूर येथील एका कंपनीला दिले आहे. परंतु, सदर कंपनीही नावापुरती असल्याचे शहरात म्हटल्या जात आहे. या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, काही धनदांडग्यांचे अतिक्रमण वाचवण्यासाठीच अशाप्रकारे काम रेंगाळत सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, बँक ,शाळा, कॉलेज, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, क्रीडा कार्यालय, न्यायालय असून, जाण्याकरिता एकमेव रस्ता असल्याने प्रचंड वर्दळ असते. त्यातच शाळेच्या विद्यार्थ्यांचीदेखील मोठी गर्दी शाळा सुटल्यानंतर व शाळा भरताना या रस्त्यावर दिसून येते. जागोजागी पडलेले खड्डे हे अपघातास निमंत्रण देत असून, आणखी एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा काही सामाजिक संघटना आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे.

 

कामाकरिता १५ महिन्यांचा कालावधी
८० फुटी रस्त्याचे सौंदर्यीकरण व रुंदीकरण कामाकरिता १५ महिन्यांचा कालावधी हा न पटणारा असून, एकीकडे शासन विकास कामे लवकरात लवकर करण्यावर भर देत असताना एवढा मोठा कालावधी देण्यामागील कारण काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...