आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिशन ऑल आऊट': संगमनेमधून पिस्तूल व काडतुसे जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या 'मिशन ऑल आऊट'मध्ये गुरुवारी मध्यरात्री शहर पोलिसांना एका संशयिताकडे पिस्तूल मिळाले. शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात तलवार, जांबिया आणि चाकू हस्तगत केल्यानंतर पिस्तूल हस्तगत करण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. प्रभारी निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई   करण्यात आली. 


शहरातील गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक सैल झाल्याने गुन्हेगारीने डोके वर काढले होते. गुन्हेगारांना पोलिसांचाच आशीर्वाद असल्याने बहुतांशी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. नगर, जामखेडमध्ये झालेल्या हत्याकांडाने पोलिस दलाची पुरती नाचक्की झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताच जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांविरोधात मोहीम उघडली. जिल्ह्यात सर्वत्र कारवाई सुरू असताना संगमनेरात मात्र आलबेल होते. 'दिव्य मराठी'ने शहर पोलिसांना काहीच सापडत नसल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर शहर पोलिस निरीक्षक गोकूळ आैताडे दीर्घ रजेवर गेल्यावर प्रभारी पदभार असलेल्या निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सतर्क झालेल्या पोलिसांनी झडती सत्र आरंभले. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन मोटारसायकली, जांबिया, चाकू आणि तलवार हस्तगत करून मिशन ऑल आऊटमध्ये आपले खाते खोलले. 


शहरातील अनेक घटनांमध्ये गावठे कट्ट्यांचा वापर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले. पोलिस निरीक्षक आैताडे यांना त्यावर अंकुश मिळवण्यात यश आले नाही. मात्र, प्रभारी पदभार असलेले तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी यात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी शहरात अनेक ठिकाणी कारवाई केल्या. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी शहरातील गजबलेल्या जय जवान चौकातील सरस्वती हॉटेलबाहेर थांबलेल्या दत्ता सुधाकर चव्हाण (राहणार इंदिरानगर) या संशयिताची झडती घेतली असता त्यांना देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे आढळली. 


देशी बनावटीचे पिस्तूल 
दत्ता सुधाकर चव्हाण याच्याकडून पोलिसांनी पंचवीस हजार किमतीचे देशी बनावटीचे काळ्या रंगाचे पिस्तूल, चारशे रुपये किमतीची मॅगेझिनमध्ये भरलेली दोन जिवंत काडतुसे आणि पन्नास हजार रुपये किमतीची हीरो होंडा करिझ्मा मोटारसायकल (एमएच १७ एपी ८७८६) ताब्यात घेतली. त्याच्याविरोधात आशिष कुंडलिक आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक छबीलदास गावंडे याप्रकरणी तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...