आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदी : 43 दुकानदारांवर कारवाई, 2.15 लाख दंड वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शनिवारपासून महापालिकेने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. शहरातील नवी पेठ, अशोक चौक, देगाव, सात रस्ता, विजापूर रोड, एमआयडीसी परिसरातील बाजार पेठ, व्यापारी संकुलातील दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात बेकायदेशीर प्लास्टिक आढळून आले तेथे पाच हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. नवी पेठेत कारवाई करताना महापालिका पथक आणि व्यापारी यांच्यात वाद झाला. शनिवारी दिवसभर ४३ दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.१५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.

 

राज्य शासनाने राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक उत्पादन, विक्री व वापरावर बंदी लागू आहे. शहरात शनिवारपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेची १० पथके तयार करून मोहीम राबवण्यात आली. कापड व्यापारी, बेकरी, नमकीन, माॅल, फुड््स, टेडर्स, कटलरी, सुपर मार्केट आदी ठिकाणी छापे टाकले. ४३ दुकानात प्लास्टिक आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी ५ हजार दंड करण्यात आला. २.१५ लाख रुपये वसूल करण्यात आले. विविध ठिकाणाहून ६०० किलो प्लास्टिक महापालिकेने जप्त केले आहे. या मोहिमेत ४७ आरोग्य निरीक्षक, ८ झोन अधिकारी, अन्न परवाना विभागाचे पथक, पोलिस, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आदींचा समावेश होता.

 

व्यापाऱ्यांनी केला विरोध
महापालिका झोन क्रमांक एकच्या वतीने नवी पेठेत कारवाई करत असताना गोंधळ झाला. पॅकिंगसाठी कॅरिबॅग असल्याचे व्यापारी सांगत होते तर ते प्लास्टिक वापरता येत नाही अशी भूमिका महापालिकेची होती. कारवाई करताना मनपा पथक व व्यापारी यांच्यात वाद झाला. दोन दुकानावर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

बाजारपेठेत काही दुकाने बंद
प्लास्टिक बंदीमुळे शहरात मोहीम असणार असल्याने नवीपेठसह काही भागातील दुकाने बंद हाेती. प्लास्टिकचे दुकान बंद ठेवण्यात आले होते. या मोहिमेत दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या एकावरही शनिवारी कारवाई झाली नाही.

 

प्लास्टिक मनपाकडे जमा करा
प्लास्टिक नष्ट करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत हाेती. आताही ज्यांच्याकडे प्लास्टिक आहे त्यांनी महापालिकेकडे जमा करावे. यापुढे कारवाई महापालिका करणार आहे.
- त्र्यंबक ढेेंगळे-पाटील, मनपा उपायुक्त.
 

रेल्वेची आजपासून कारवाई मोहीम
महाराष्ट्र शासनासह मध्य रेल्वे प्रशासनाने देखिल शनिवारपासून महाराष्ट्रातील सर्व स्थानकांवर प्लास्टिक वापरावर बंदी घातली. सोलापूर रेल्वे प्रशासनाने देखिल याची तयारी केली असून रविवारपासून वाणिज्य विभागाची पथके खाद्यपदार्थ स्टॉल विक्रेत्यांची तपासणी करणार आहेत. यापूर्वीच फलाटावरील विक्रेत्यांना प्लास्टिक न वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या ट्रॅकवर अथवा इतरत्र न टाकता बॉटल क्रशिंग मशिनमध्ये टाकून ते नष्ट करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांना वेफर्स, चिप्सच्या आवरणांना बंदी घालण्यात न आल्याने विक्रेते त्याची विक्री करू शकतील.

 

कापडी व पेपर बॅग निर्मितीचे सोमवारी प्रशिक्षण
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने २५ जून रोजी पाच दिवसीय कापडी व पेपर बॅग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक कॅरीबॅगला राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यासाठी कापडी बॅग व कागदी बॅग याला महत्त्व येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात शॉपिंग मॉल, किराणा दुकाने, फळे व भाजीपाला, वैद्यकीय तसेच इतर ठिकाणी कागदी बॅग वापरण्यात येणार आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी विशाल सुर्वे ९८९०५६०६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. आर. शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...