आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३४ गावांतील मतदान केंद्रे संवेदनशील; निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समितीसाठी रविवारी सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने बाजार समिती मतदारसंघातील ३४ गावांतील मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर केली आहेत. या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त राहणार अाहे, शिवाय मतदान केंद्रावरील मतदानाचे व्हिडिओ चित्रण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. दोन्ही पॅनलकडून निवडणूक लढवित असलेल्या गणातील प्रमुख गावे संवेदनशील जाहीर केल्याचे दिसते. 


मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावांत मतदान होत असून १२ गावांतील मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यामध्ये मंद्रूप, वडकबाळ, वांगी, कंदलगाव, गुंजेगाव, विंचूर, वडापूर, भंडारकवठे, निंबर्गी, औराद, बरूर, माळकवठे या १२ गावांतील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. शिवाय सर्व मतदान केंद्रावरील मतदानाचे व्हिडिओ चित्रण करण्यात येणार आहे. 


तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४८ गावांपैकी १८ गावे संवेदनशील आहेत. यामध्ये कळमण, कौठाळी, गावडी दारफळ, नान्नज, बीबीदारफळ, पाकणी, कारंबा, मार्डी, होनसळ, बोरामणी, कासेगाव, उळेगाव, बक्षीहिप्परगा, मुळेगाव तांडा, तिऱ्हे, पाथरी, कोंडी या गावांचा समावेश आहे. वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३५ गावांपैकी ४ गावे संवेदनशील जाहीर केली आहेत. यामध्ये कुंभारी, मुस्ती, होटगी व आहेरवाडी या गावातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. 


कर्मचाऱ्यांना नाही मतदानाचा अधिकार 
मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी 'नाव मतदार यादीत असून आम्हाला मतदान करता येणार का?' असा प्रश्न विचारला होता. राज्य सहकारी प्राधिकरणाने टपाली मतदानाची कोणतीही तरतूद केलीच नाही. यामुळे मतदान करता येणार नसल्याचे निवडणूक अधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...