आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला युतीची इच्छा नाही, पण भाजप सेनेला सोडणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- शिवसेनेला भाजपसोबत युती करण्याची इच्छा नाही तर भाजप शिवसेनेला सोडायला तयार नाही. सेनेबरोबर युती न झाल्यास भाजपचे अस्तित्व संपेल. भाजपकडून युतीसाठी प्रसंगी साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर केला जाईल, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते सोलापूर येथे कार्यक्रमासाठी निघाले होते दरम्यान त्यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 

 

चव्हाण म्हणाले, शिवसेना सरकारमध्ये असूनदेखील सरकारवर आणि भाजपवर टीका करते. सेनेला युती करण्याची इच्छा नाही, मात्र शिवसेनेबरोबर युती ही भाजपची गरज आहे. देशात 2014 मधील लोकसभेत भाजपला मित्रपक्षांसह 31 टक्के मते मिळाली. भाजपच्या विरोधात 69 टक्के मतदान आहे. 2019 ला सर्व समविचारी विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजप सत्तेतून निश्चितपणे पायउतार होईल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

 

शेतकरी धोरणावरुन केंद्रावर सडकून टीका 
केंद्राने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंचावन्न रुपये अनुदान दिलेल्या निर्णयावरदेखील चव्हाण यांनी सडकून टीका केली. ही मलमपट्टी आहे. यातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे त्यांनी सांगितले. साखरेच्या दरातील अस्थिरता लक्षात घेता उसाच्या एफआरपी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. केंद्रात आणि राज्यात शेतीची माहिती असणारा एकही नेता सरकारमध्ये नाही. सरकारजवळ अनुभव कमी आहे. विरोधकांशी चर्चा करून एखादा निर्णय घेण्याचे धाडस या सरकारकडे नसल्याचे ते म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विजयी होईल, असा विश्वासदेखील या वेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.    


राष्ट्रवादीला लगावला टोला 
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला नसता तर भाजप सरकार सत्तेवर आलेच नसते. आघाडी मोडली म्हणून हे भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी यापुढे तरी सामंजस्याने वागावे, असाही टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

बातम्या आणखी आहेत...