आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांच्या आत्महत्येला २ महिने पूर्ण, मुख्य संशयित गायबच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'म्होरक्या' या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांच्या आत्महत्येस मंगळवारी दोन महिने पूर्ण झाले. परंतु या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार श्रीनिवास संगा अद्याप पोलिसांना सापडत नाही. त्याला पकडून कठोर शिक्षा करण्याची मागणी पडाल कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्याचे स्मरण करणारे पत्र पुन्हा एकदा देणार असल्याचे सांगितले. 


संगा आणि त्याचा साथीदार संतोष बसुदे यांनी पडाल यांना कर्जाऊ रक्कम दिली होती. परतफेडीसाठी तगादा लावला. घरातून उचलून नेणे, शिवीगाळ आणि मारहाण करणे हे कृत्य सुरू झाले. याबाबत पडाल यांनी १५ मे २०१८ रोजी पाेलिस आयुक्तांना भेटून त्यांच्यापासून धोका असल्याचे निवेदन दिले. 


संरक्षण मिळाले नाही, आत्महत्या करण्याचा इशारा दिला हाेता. परंतु पोलिसांनी वेळीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे पडाल यांनी १७ मे रोजी अशोक चौकातील राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येस संगा आणि बसुदे हेच कारणीभूत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. 


त्यानंतर अशोक चौक पोलिस चौकीत या दोघांच्या विरोधात खासगी सावकारीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री संगा गायब झाला. दोन महिने उलटले तरी तो पोलिसांच्या हाती लागला नाही. 


सक्त सूचना केली 
पडाल यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित संगा याला पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची पथके तयार केली. कुठल्याही परिस्थितीत त्याला जेरबंद करण्याची सूचना दिली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सांगितले.'' महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 


गृहमंत्र्यांना निवेदन 
दोन महिने उलटले तरी या प्रकरणातील मुख्य संशयित पोलिसांना सापडत नसल्याने थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित पडाल वाचले असते. परंतु आत्महत्येसारखी घटना घडूनही पोलिस गंभीर नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार दिली.
- निरंजन बोद्धूल, अध्यक्ष, खासगी सावकारविरोधी कृती समिती 

बातम्या आणखी आहेत...