आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानासाठी प्रस्ताव देऊ नका, शासन मदतीवर प्रगती साधावी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन अनुदानाच्या माध्यमातून मदत करीत आहे. मात्र फक्त शासनाचे अनुदान मिळते, म्हणून प्रस्ताव सादर करू नका. शेतकरी गटाच्या क्षेत्राचा शेतकऱ्यांचा विचार करून गटाचे भाग भांडवल वाढवावे, गटाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. 


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कृषी विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी कॅप्टन परदेशी, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, रवींद्र माने यांच्यासह तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, शेतकरी गटाचे प्रमुख उपस्थित होते. 


राज्य शासनाने समूह शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी एका गटाला कोटी रुपयांची मदत देणार आहे. गटशेतीला विविध प्रक्रिया उद्योग, नवीन उपक्रम राबविणे आदींसाठी एका गटाला कोटीप्रमाणे सहा गटांना कोटी रुपयांची रक्कम मंजूर आहे. या रकमेतून गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन उपक्रम राबवावे, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करावा स्वत:ची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 


शेतकरी समृद्ध आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी काम व्हावे. यासाठी गटामार्फत करण्यात येणाऱ्या बाबींचा सविस्तर प्रकल्प आराखडा तत्काळ सादर करावा. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी गटांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 


समूह शेती, ठिबक, तुषार सिंचन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, माती परीक्षण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे या योजनांचा आढावा घेण्यात आला. मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या तालुक्यांची मागणी नाही, त्या तालुक्याचे उर्वरित उद्दिष्ट इतर तालुक्यास वर्ग करावे, तसा प्रस्ताव सादर करावा. 


ठिबक तुषार सिंचन योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांना विशेषत: ऊसशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक करण्यासाठी प्रोत्साहित करावे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ३८ प्रस्ताव प्रलंबित आहेत, ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 


फोटो अपलोड होण्याची कारणे सांगा... 
जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे फोटो अपलोड का होत नाहीत? याची कारणे संबंधित तालुकास्तरीय अधिकारी यांनी सादर करावीत. राज्यात सोलापूर जिल्हा फोटो अपलोड करण्यात अजूनही खालच्या क्रमांकावर आहे. महिनाअखेरपर्यंत पूर्ण कामांचे फोटो अपलाेड पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...