आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, राजू शेट्टींचे पांडुरंगाला साकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे म्हणून सोमवारपासून सुरू झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाखो लिटर्स दुधाचे संकलन ठप्प झाले. काही ठिकाणी दुधाची रस्त्यावर नासाडी झाली तर कुठे मोफत वाटप झाले. वारीत सहभागी वारकऱ्यांना दूध वाटप करून पुण्य कमावण्याबरोबरच काही ठिकाणी अल्प दरात त्याची विक्रीही झाली. माढा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी दूध आटवण्याचा पर्याय शोधून मोल साधले. 


दरम्यान, दरवाढीसाठी सरकारचे उंबरठे झिजवून आम्ही दमलो. मात्र हे सरकार आम्हाला न्याय देत नाही. पांडुरंगा, आता तूच शेतकऱ्यांना न्याय दे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तुझ्या दर्शनासाठी येणार आहेत, त्यांना सुबुद्धी दे आणि आमची मागणी मान्य करण्यास सांग, असे साकडे खासदार राजू शेट्टी यांनी पांडुरंगाच्या चरणी घालून आंदोलनाला सुरुवात केली.


खासदार शेट्टी यांनी रविवारी मध्यरात्री पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाद्वारात नामदेव पायरीजवळ विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीस दुग्धाभिषेक करून आंदोलनास प्रारंभ केला. 
पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ३५ रुपये असताना निम्म्या दराने म्हणजे १७ ते १८ रुपयांनी दुधाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने दरवाढ करावी, अशी आमची रास्त मागणी आहे. आम्ही आंदोलन करणार म्हटल्यावर सकाळपासून पोलिस आमच्या मागे लागतात. आंदोलन करायचे नाही, अशी दडपशाही केली जात आहे. एक प्रकारे आणीबाणीसारखी परिस्थिती दिसत आहे. मात्र जोपर्यंत शासन प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धारही त्यांनी ळी व्यक्त केला. 


सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात तीव्र आंदोलन झाले. माढा तालुक्यात दोन लाख लिटर दुधाचे संकलन झाले नाही. वाहने अडवून दूध वाटप करण्याबरोबरच महापुरूष व देवादिकांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. काही शेतकऱ्यांनी दूध आटवले. सांगोला तालुक्यातही सुमारे नऊ लाख लिटर दूध उत्पादकांच्या घरीच राहिले. काही जणांनी चार ते पाच रुपये लिटरप्रमाणे विक्री केली. मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व फवारणीद्वारे फळबागा, भाजीपाल्याला दूध घातले. करमाळ्यातही रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त करण्यात आला. 


अाज तीव्रता वाढणार
मंगळवारी दुसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र हाेण्याची शक्यता अाहे. गुजरातमधून मुंबईकडे येणारे दूध टँकर राेखण्यासाठी शेट्टी पालघरकडे रवाना झाले अाहेत. 


अाज मुख्यमंत्र्यांची बैठक
दूध उत्पादकांना थेट अनुदान देण्याची मागणी मात्र सरकारने मान्य केली नाही. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष व गटनेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री या विषयावर बैठक घेणार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...