आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यातून स्वाभिमानीकडून रविकांत तुपकर लढणार, तयारी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी- माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या मतदारसंघाचा दौरा निश्चित केला आहे. मतदारसंघातील गावे पिंजून काढणार आहेत. तुपकर यांनी ऊसदर, दूधदर, हमीभाव, शेतीकर्ज माफी याप्रश्नी आंदाेलन केले आहे. 


माढा   लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २००९ पासून ऊसदरासह अनेकप्रश्नी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी संघटनेला बळ दिले. गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते यांच्याविरोधात स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी लढत दिली. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या ऊसदर, दूधदर, उसाचा एफआरपी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, सीना-भीमा नदीत पाणी सोडणे, सीना-माढा उपसा योजनेत पाणी सोडणे, वीज यासह विविध प्रश्नांवरील आंदोलनात रविकांत तुपकर यांनी नेतृत्व केले. पंढरपूर, माढा, माळशिरस, सोलापूर आदी भागात हे आंदोलन झाले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळ वाढले. त्यामुळे स्वाभिमानी संघटना बुलढाण्याचे तुपकर यांना मैदानात उतरवणार आहे. ते पक्षाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे विश्वासू मानले जातात. ते भाजप सरकारमध्ये वस्त्र व उद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. खासदार शेट्टी सत्तेतून बाहेर पडल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. 


माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण ही गावे आहेत. त्यामुळे संघटनेचे जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन या मतदारसंघातील निवडणुकीविषयी चर्चा केली. त्याला घुगे यांनी दुजोरा दिला आहे. कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या बैठकीत तुपकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याची पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्याकडे मागणी केली. तेव्हापासून तुपकर यांनीही मतदारसंघातील संपर्क वाढवला आहे. 


पक्षाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अाहे. जूनच्या पहिल्या आठवठ्यापासून संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहे. राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही निवडणूक लढवणार आहे. आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन मैदानात उतरणार आहोत. 
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 


माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन केले. यामुळे शेतकरी आमच्या पाठीशी आहेत. यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आशादायी आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 
- सिद्धेेश्वर घुगे, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

बातम्या आणखी आहेत...