आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांच्या घराचा निर्णय आल्यावरच इतर अतिक्रमणे काढा -आमदार बच्चू कडू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकारमंत्र्यांचा बंगला आरक्षित जागेवर आहे. तो अतिक्रमणित आहे. त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वसामान्याचे रोजगार देणाऱ्या जागेवरील अतिक्रमण काढू नका, अशी भूमिका प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मांडली. तसेच शहरातील अपंगांवर निधी खर्च करा, अशी सूचना करत निधी खर्च केला नाही तर प्रहार संघटना स्टाइलने यापुढे महापालिकेत येऊ, असेही ते म्हणाले.


शहरातील अपंग निधी खर्चाबाबत महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे यांना निवेदन देण्यासाठी आमदार कडू सोमवारी महापालिकेत आले होते. प्रारंभी त्यांनी महापालिका आयुक्तांशी ७० फूट रोडवरील अतिक्रमणाबाबत चर्चा केली. त्यानंतर बोलताना आमदार कडू म्हणाले, रस्त्यावर कोणाला बसवू देऊ नका, तेथील विक्रेत्यांना काढल्यावर तेथे पुन्हा विक्रेते येत असतील तर तेथून गेलेल्या विक्रेत्याच्या पोटावर पाय पडेल. सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढत असताना, सहकारमंत्र्यांचा बंगला अतिक्रमणित झाला आहे. त्यामुळे त्या बंगल्याचा निर्णय होत नाही, तो पर्यंत सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढू नका. कायदा सर्वसामान्यांसाठी वापरला जातो. श्रीमंतासाठी कायदे येतील. त्यावेळी अच्छे दिन येतील. सहकारमंत्र्यांचा बंगला अतिक्रमणित आहे या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी आयुष्य जाईल. भाजपचे डीएनए केले तर तेथे निम्मे लोक काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. सगळे भाऊ आहेत, अशी टीका आमदार कडू यांनी केली. यावेळी त्यांनी ७० फूट रोडवरील विक्रेत्यांची भेट घेतली. 


नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्या, कायदा आम्हालाही कळतो 
प्रहार संघटनेच्या माध्यमातून जनहिताची, नागरिकांच्या प्रश्नांची निवेदने शासकीय कार्यालयांकडे येतात. पण त्याची प्रशासन तत्काळ दखल घेत नाही. शेतकरी, दिव्यांग, आरोग्यविषयक विषयात गतीने निर्णय घेतले जात नाहीत. यापुढील निवेदन वा तक्रारीवर प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आम्हालाही कायदा चांगलाच कळतोय, असा सूचनावजा इशारा आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना सोमवारी दिला. 


निधी खर्च करू 
शहरातील अपंगांसाठी महापालिकेच्या बजेटच्या ३ टक्के रक्कम खर्च करू. त्यानुसार बजेटमध्ये तरतूद केली आहे. 
- डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त 


अधिवेशनात सहकारमंत्र्यांच्या घराचा प्रश्न विचारणार
हिवाळी अधिवेशनात सहकारमंत्री देशमुख यांच्या घराचा प्रश्न विचारणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...