आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९७३ पासून आरक्षित ५२ जागांवर महापालिकेचे नाव लावले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दवाखाना, अभ्यासिका, शाळा, मैदान, वेअर हाऊस, मनपाचे नाके, पोलिस चौकी, मार्केट आदी नागरी सुविधांसाठी १९७३ मध्ये महापालिकेच्या नावाने अवाॅर्ड करून दिलेल्या जागेवर अद्याप महापालिकेने सात- बारावर नाव लावले नाही. त्यामुळे आता त्या जागा मूळ मालकांच्या नावाने दिसून येत आहेत. त्या जागेचा गैरवापर होऊन नागरी हितास बाधा येऊ शकतो. ही बाब महापालिकेस एका शाळेच्या जागेवरून निदर्शनास आली. आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी तत्काळ हालचाल करून पुढील प्रक्रिया सुरू केली. 


याप्रकरणी काही जणांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. शहरात अशा प्रकारच्या ५५ जागा असून, त्यापैकी फक्त ३ जागांवर महापालिकेचे नाव आहे. अन्य जागेवर मूळ जागा मालकांचे नाव दिसून येत आहे. शहर विकास आराखडा क्र. चार १० आॅक्टाेबर १९७३ रोजी मंजूर करण्यात आला. त्यांची अंमलबजावणी १ डिसेंबर १९७३ पासून झाली. यानुसार अवाॅर्डनुसार सुमारे ५५ जागा आहेत. त्यापैकी फक्त ३ जागांवर महापालिकेची मालकी सात बारावर दिसून येते. अन्य ५२ मिळकतीचे मालक सातबारा नुसार मूळ मालक दिस्ून येतो. महापालिका भूमी व मालमत्ता विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी याबाबत सिटी सर्व्हे कार्यालयाकडून नाव नोंदणी करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. ही बाब आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी भूमी व मालमत्ता विभागाकडून माहिती मागवली. त्यात ५२ मिळकतीवर पालिकेचे नाव नाही हे दिसून आले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या. यासाठी तुपदोळकर यांची नियुक्ती करून मनपाच्या मालकीच्या जागेचा शोध घेण्यात येत आहेत. 


महापालिकेच्या यांना नोटिसा 
अवाॅर्डनुसार जागा मालकांचे नाव लावण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली. त्यापैकी वीरभद्रेश बसवंती, शिवशंकर काडादी, अनिल मसरे, नंदकिशोर पंचारिया, शिवशंकर अवसे यांच्या नावाने नोटीस काढण्यात आली आहे. 


गैरवापर होण्याची शक्यता आहे 
अवाॅर्ड नुसार टी पी ४ मधील जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. ती देण्यास कोणाचाही विरोध नाही. महापालिकेने काम असताना ते केले नाही. त्यापैकी मूळ जागा मालकांच्या नावाने उतारे निघण्याची शक्यता आहे. त्यांचा गैरवापर काही जागा मालकांकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया सुरू केली. 


आम्हाला नोटीस आली नाही 
महापालिकेने नोटीस काढली असली तरी ती अद्याप मला मिळालेली नाही. नोटीस आल्यावर त्यास उत्तर देऊ. कशाची जागा आहे ते पाहावे लागेल.
-  वीरभद्रेश बसवंती 


जागा महापालिकेच्या नावाने करून घेऊ 
अवाॅर्डच्या जागा महापालिकेच्या नावाने करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याबाबत संबंधित विभागास योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
- डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त