आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकलूजची लावणी स्पर्धा सुरू ठेवण्याचा पुनर्विचार; स्पर्धेचे जनक जयसिंह मोहिते यांची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धा सुरू ठेवण्याचा पुनर्विचार करण्यासाठी लवकरच विशेष बैठक आयोजली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय झाला तर नव्या पिढीकडे स्पर्धेची सूत्रे देण्याबाबत विचार केला जाईल, असे या स्पर्धेचे जनक जयसिंह मोहिते यांनी सांगितले. जयसिंह यांनी लावणी स्पर्धा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही परंपरा खंडित करू नका, अशी गळ घातली जात आहे. २५ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. 


दरम्यान, ही अखेरची स्पर्धा असल्याने मराठी मनाचा ठाव घेणारी लावणी लावणी कलावंत आणि रसिक जड अंत:करणाने परतले. स्पर्धेचे सूप वाजत असतानाही ते सुरू करणारे जयसिंह मोहिते यांनी एक सूचक आश्वासनही दिले. स्पर्धा बंदचा निर्णय झाल्यानंतर ती सुरू ठेवण्यासाठी विनंत्या-सूचना येऊ लागल्या. मावळत्या स्पर्धेत कलावंतांनीही लोककलेच्या या आदर्श व्यासपीठाने आम्हाला किती अवसान दिले, हे बंद झाल्यावर काय होईल? अशा आशयाच्या लावण्या सादर करून सर्वांना भावुक केले होते. 


जयसिंह म्हणाले, सर्वांच्या आग्रहाचा विचार करून स्पर्धा सुरू ठेवण्यासंदर्भात पुनर्विचार करू. खासदार विजयसिंह मोहिते, आमदार दिलीप सोपल, राज्यातील थिएटर मालक आणि निवडक कलावंतांची विशेष बैठक लवकरच घेऊ. यात सर्वानुमते योग्य निर्णय घेऊ. सकारात्मक निर्णय झाल्यास स्पर्धेची सूत्रे पुढच्या पिढीकडे देण्याबाबत विचार करू. आतापर्यंत जो दर्जा, जी उंची या स्पर्धेने राखली आहे, ती प्रतिष्ठा कायम राहण्याची हमी मिळायला हवी. 


सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीकडून १९९३ पासून या स्पर्धा घेतल्या जातात. २५ वर्षे अखंडित चालणारी ही राज्यातील अशी एकमेव स्पर्धा आहे. ही परंपरा खंडित करू नका, असे खासदार शरद पवार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदींनी सांगितले. लावणी कलावंत, थिएटर मालक आणि लावणी रसिक यांनीही जयसिंह मोहिते यांना विनंती केल्याने ही स्पर्धा सुरू राहण्यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. 


स्पर्धेतील पारंपरिक गटाचा निकाल 
प्रथम : पौर्णिमा मयुरी नगरकर, जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र, सणसवाडी (२५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह), द्वितीय : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी, यवत -चौफुला, जि. पुणे (२० हजार रुपये, स्मृतिचिन्ह), तृतीय विभागून : बबनबाई मीरा पडसाळीकर, पद्मावती कला केंद्र, मोडनिंब, नंदा उमा इस्लामपूरकर, नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब (१५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह), उत्कृष्ट मुजरा : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी, यवत - चौफुला (तीन हजार रुपये), उत्कृष्ट ढोलकी : पल्लवी जाधव (स्वरांजली कलाकेंद्र, मोडनिंब), उत्कृष्ट पार्श्वगायिका : प्राजक्ता महामुनी (शामल, सुनीता, स्नेहा लखनगावकर, मोडनिंब), उत्कृष्ट पेटीवादक : मनोज कुडाळकर (नंदा उमा इस्लामपूरकर, मोडनिंब) उत्कृष्ट तबला : अजय डावाळकर (नटराज लोकनाट्य कलाकेंद्र, मोडनिंब, प्रत्येकी एक हजार ). 

बातम्या आणखी आहेत...