आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांबोटी शिवारात पंपावर सशस्त्र दरोडा, साडेचार लाख लुटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- चार दरोडेखोरांनी तलवार, कोयत्याचा धाक दाखवत तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून पेट्रोलपंपावरील दोन मोबाइल, साडेचार लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी (दि. १३) पहाटे दोनच्या सुमारास लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. पोलिसांत नोंद झाली आहे. 

 

लांबोटी गावालगत जोशाबा पेट्रोलपंप आहे. ११ मार्चला रात्री व्यवस्थापक सोहेल शेख, सोमनाथ अवशेट्टी, गणेश शिवपुजे हे कामावर होते. सोहेल शेख हे कार्यालयात झोपी गेले. मध्यरात्री बाराच्या सुमारास सोमनाथ हा कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप लावून पंपावर थांबला. बाजूलाच गणेश झोपला होता. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास पांढरी इंडिका कार पंपावर आली. जेवण करण्यासाठी थांबणार असल्याचे त्यातल्या एकाने (वय ३५) सांगितले. गाडी बाजूला उभी करून त्यातला एक थांबला. सोमनाथ पंपालगत अंथरुणावर पडून राहिला. दोनच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाल्याने तो उठला. तेव्हा दोघे कोयता व तलवारीचा धाक दाखवत रोकड कोठे आहे, याची विचारणा करू लागले. 


सोमनाथने खिशातील रक्कम काढून दिली. त्यांनी हाताने मारहाण करत उर्वरित रोकड कोठे आहे, असे विचारले. त्याने व्यवस्थापकाच्या खोलीत रोकड असल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोघांनी झोपेतील गणेशला उठवले. त्याचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांना बळजबरीने कार्यालयाकडे नेऊन मारण्याची धमकी दिली. कार्यालयाला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. झोपलेल्या व्यवस्थापक सोहेललाही उठवून त्याचा मोबाइल घेतला. त्यालाही मारहाण करत लाॅकरमधील रोकड घेतली. कपाट, ड्राॅवरच्या चाव्या हिसकावल्या. एका दरोडेखोराने सीसीटीव्हीचा डीव्हीआर मशिनही काढून टाकला. त्याची पाच हजारांची डिस्प्ले स्क्रीन काढून घेतली. तिघा कर्मचाऱ्यांना लॉकर असलेल्या खोलीत कोंडून दरोडेखोर पसार झाले. 

 

पहाटे ग्राहकामुळे तिघे बाहेर 

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पंपावर आलेल्या एका ग्राहकाने हॉर्न वाजवला. त्यावेळी बंद खोलीतील तिघा कर्मचाऱ्यांनी मोठमोठ्याने दरवाजा वाजवायला सुरुवात केली. ग्राहकाने कार्यालयाचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले. या प्रकरणी सोमनाथ अवशेट्टी याने फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजू राठोड तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...