आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक वेस्टन काढून माल विकण्याचा काढला तोडगा; कारवाईने व्यापारी अस्वस्थ, नागरिकांचीही तारांबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्लास्टिक बंदीमुळे मालाच्या पॅकिंगचे प्लास्टिकही चालणार नाही, असा पवित्रा मनपाने घेतल्याने कपडे व्यापारी अस्वस्थ झाले अाहेत. दरम्यान मनपाबरोबर झालेल्या चर्चेत पॅकिंग असलेले प्लास्टिक काढून कपडे वा वस्तू ग्राहकांना द्यावेत, प्लास्टिकसह बाहेर देऊ नये, असा तोडगा काढण्यात अाल्याने बाजारपेठेतील वाद टळला अाहे. दरम्यान किरकोळ तेल, मसाले, लोणचे विक्री करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली अाहे. तर नामवंत कंपन्यांच्या वस्तूवर प्लास्टिकचे अवरण अाहे, त्यावर मात्र बंदी नसल्याने हा दुजाभाव का? असाही प्रश्न विचारला जात अाहे. 


रेडिमेड कपडे प्लास्टिकमध्ये पॅक असतात. लहान मुलांचे कपडे, होजिअरी, मोबाइल, शूज, सॉक्स, लहान खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी अनेक वस्तू प्लास्टिकमध्ये पॅक असतात. महापालिका त्यांच्यावरही कारवाई करत होती. कारवाईच्या पहिल्या दिवशी शनिवारी महापालिकेच्या पथकाने नवी पेठेत छापे टाकले. त्यावेळी काही ठिकाणी त्यांना प्लास्टिक आढळून आले तर अनेक ठिकाणी दुकानात सर्व वस्तू प्लास्टिकमध्ये पॅकिंग असल्याचे आढळून आले. महापालिका आणि दुकानदार यांच्यात वाद झाला. कंपनीकडून प्लास्टिकचे वेस्टन येत असते. ते जर काढून दुकानात ठेवले तर वस्तूंवर धूळ साचून सर्व खराब होतील. असा मुद्दा दुकानदारांनी मांडला. 


दूध पाकिट असो किंवा काही स्नॅक्स ते सुध्दा कंपनीकडून पॅकिंग असते, त्यांना सूट देण्यात आली आहे. मग आमच्या या वस्तूंना का नाही? असा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला. बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर महापालिकेने मार्ग काढला. दुकानातील जे साहित्य प्लास्टिक पिशवीत आहे, ते विकताना कॅरीबॅग काढून देणे, ते कॅरीबॅग गोळा करून ठेवणे, महापालिकेची घंटागाडी आल्यावर ते गोळा करून ठेवलेल्या सर्व कॅरीबॅग टाकणे, अशा अटी महापालिकेने घातल्या. त्या सर्व अटी व्यापाऱ्यांनी मान्य केले. अनेक व्यापारी आपले वस्तू कागदामध्ये गुंडाळून देत आहेत. तर काहीजण कापडी पिशव्यांचा वापर करत आहेत. 


सध्या कागदाचा वापर 
प्लास्टिक पिशवीतील वस्तू काढून त्या ग्राहकांना विकायच्या. प्लास्टिक पिशव्या घंटागाडीत टाकायचे, असे ठरले आहे. महापालिकेच्या या अटी मान्य केल्या. इतर काही व्यापाऱ्यांनीही हे मान्य केले. महापालिकेच्या भूमिकेबद्दल सर्व व्यापाऱ्यांनी महापालिकेचे आभार मानले. सध्या कागदामध्ये वस्तू गुंडाळून देत आहोत. काही दिवसात कापडी पिशव्या येतील आणि त्याचा वापर होईल.
- केतन शहा, व्यापारी 


पाच हजार रुपयांच्या दंडामुळे प्रभाव दिसतोय 
प्लास्टिक पिशवी किंवा प्लास्टिक वापरले तर पाच हजार रुपयांपासून दंड अाकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली अाहे. त्यामुळे प्लास्टिक घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण रविवारी कमालीचे घटल्याचे दिसत अाहे. पाच हजार रुपयांच्या दंडाची चर्चा सर्वत्र होताना दिसते अाहे. काही किरकोळ व्यापारी मात्र या निर्णयामुळे संतप्त झाले अाहे. सोलापुरातच उत्पादन करून पॅकिंग करून विकणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली अाहे. त्यांना पर्याय मिळेपर्यंत व्यवसाय बंदच ठेवावा लागण्याची चिन्हे अाहेत. 


बंदीविषयी स्पष्टता नाही 
पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाड असेल तर अशा पिशव्यांना बंदी नाही. महापालिका कारवाई तर करत आहे. मात्र त्यांच्याकडे अजून कारवाईचे चित्र स्पष्ट नाही, असे वाटते. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडून संपूर्ण चित्र स्पष्ट करून घ्यावे. दुधाच्या पिशव्या चालतात तर तेलाचे का चालत नाही? तेलाच्या पिशव्या तर जाड असतात. अद्याप आमच्याकडे महापालिकेचे पथक आले नाही.
- अभिजित परदेसी, तेल व्यापारी 

बातम्या आणखी आहेत...