आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला अभियांत्रिकी देण्यास अनुकूल, सोलापूर का नाही? निलंगेकरांचे तावडेंना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संभाजी पाटील निलंगेकर यांनी तावडेंना दिलेले पत्र - Divya Marathi
संभाजी पाटील निलंगेकर यांनी तावडेंना दिलेले पत्र

सोलापूर- लातूरचे पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नका. त्यासह शासकीय अभियांत्रिकी सुरू करा, अशा मागणीचे एक पत्र लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले. त्याच पत्रावर शेरा मारताना श्री. तावडे यांनी, 'मुलींचे तंत्रनिकेतन सुरू ठेवावे. अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयाचा नवीन प्रस्ताव त्वरित सादर करावा,' असे आदेश संबंधितांना दिले. ही बाब सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनबाबतही शक्य नाही काय? 


सोलापूरसह लातूर, जळगाव, धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्प्याने बंद करून शासकीय अभियांत्रिकी सुरू करण्याचा निर्णय गेल्याच वर्षी झाला. त्याने सोलापूरला ५६ वर्षांपूर्वी मंजूर झालेले आणि नंतर कराडला नेलेले अभियांत्रिकी पुन्हा मिळाल्याचा आनंद झाला. परंतु तो फार काळ टिकला नाही. तंत्रनिकेतन बंद करू नये, म्हणून काही संघटना रस्त्यावर उतरल्या. आंदोलन इतके पेटले की, त्यात राजकारण घुसले. शेवटी निर्णय झाला की, तंत्रनिकेतन पूर्ववत ठेवून अभियांत्रिकीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. साेलापूरसाठी ही मोठी नामुष्की ठरली. 


निलंगेकर यांनी रेल्वे फॅक्टरीचा दिला संदर्भ 
लातूरला डबे निर्मिती कारखाना मंजूर झाला. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून उपलब्ध होऊ शकते. सबब, लातूर शहर व मराठवाड्यास शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय अशा दोन्ही संस्थांची आवश्यकता आहे. त्यामुळे पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन बंद न करता, स्वतंत्र परिसरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करावे. (निलंगेकरांच्या पत्रातील शेवटचा उतारा) 


सोलापूरसाठी पुन्हा प्रयत्न करणार 
लोकांच्या मागणीनुसार मी शासकीय अभियांत्रिकीला मंजुरी आणली होती. परंतु काही लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे ते परत गेले. लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पत्राला दाद देऊन शिक्षणमंत्री दोन्ही संस्था देत असतील तर तोच धागा घेऊन सोलापूरसाठी प्रयत्न करणार. त्यात सोलापूरचेच कल्याण आहे.

- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 

बातम्या आणखी आहेत...