आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूर तालुक्यात आगमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे तिसरे गोल रिंगण उघडेवाडी येथील ठाकूरबुवांच्या समाधीजवळ पार पडले. - Divya Marathi
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे तिसरे गोल रिंगण उघडेवाडी येथील ठाकूरबुवांच्या समाधीजवळ पार पडले.

पंढरपूर- रूप पाहता लोचनी, मन आनंदले । सर्व सुखाचे आनंदधन विटेवर पांडुरंग।। भजन कीर्तनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल । सार्थक होते जीवनाचे म्हणता विठ्ठल विठ्ठल।।  या भावनेने आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी येथे दाखल होत आहेत. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे शुक्रवारी (दि. २०) पंढरपूर तालुक्यात आगमन झाले.     


वारकरी संप्रदायात आषाढी यात्रेला कुंभमेळ्याइतकेच महत्त्व आहे. त्यात सहभागासाठी आणि श्री विठूरायाच्या भेटीच्या ओढीने मजल दरमजल करत सुमारे १५ ते २०  दिवसांचा पायी प्रवास करत संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या तालुक्यात आल्या आहेत. तालुक्याच्या सीमेवर जिल्हा प्रशासनाने दोन्ही पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. दरम्यान, राज्यासह  शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविक  मोठ्या संख्येने आषाढी एकादशीदिवशी पुण्याचे समजले जाणारे विठोबा माउलीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.  त्यामुळे सध्या पंढरी नगरीतील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, ६५ एकर परिसर, गर्दीने फुलला आहे. येथील गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, कैकाडी महाराज मठात भाविकांची वर्दळ वाढली आहे.    


यात्रेसाठी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्गावर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. गेले एक,  दोन दिवसरात्र मेहनत घेऊन त्यांनी  दुकानांमध्ये आकर्षक पद्धतीने मालाची मांडणी केली आहे. यात प्रासादिक वस्तू, फोटो फ्रेम, देवतांच्या तांब्या, पितळीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, विविध धार्मिक ग्रंथ, सीडी, कॅसेटचा समावेश आहे.  


उजनीचे पाणी चंद्रभागेत  
यात्रेसाठी उजनीतून सोडलेले पाणी चंद्रभागा नदीपात्रात पोहोचले आहे.  भाविकांची स्नानाची चांगली सोय झाली आहे. स्नानानंतर भाविक चंद्रभागा नदीपात्रातील  विष्णुपद मंदिराकडे दर्शनासाठी नावेतून जात आहेत.  काही दिंड्या ६५ एकर परिसरात मुक्कामासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहुट्या उभारण्याच्या कामात वारकरी व्यग्र आहेत. चंद्रभागेच्या पात्रात भाविक स्नानानंतर पूजा, हरिपाठ वाचन,  नाचत भजन, कीर्तन करत आहेत. तसेच पालिका, महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण मोहीम राबवल्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते मोठे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...