आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा वाळू उपसा बोकाळला, महसूल विभागाकडून डोळेझाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यात सर्वत्र वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. शासनाच्या मालमत्तेची लूट होत असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. ग्रामीण भागातील पोलिस पथक कारवाई करत आहे. मात्र शहर पोलिस किंवा जिल्हा महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. 

 

जिल्हाधिकारी असताना प्रवीण गेडाम आणि तुकाराम मुंडे यांनी बेकायदा वाळू उपशावर लगाम लावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी वाळू लिलाव ऑनलाइन, बारकोड पावत्या, वाळू वाहतुकीचा येण्या जाण्याचा मार्ग एकच, उपसा आणि नाक्यावर सीसीटीव्ही ही यंत्रणा सुरू केली होती. याचा पायलेट प्रोजेक्ट म्हणून राष्ट्रीय पातळीवर स्वीकार झाला. मात्र सध्या हा प्रोजेक्ट कुठेच दिसून येत नाही. निदान वाळू उपसा आणि नाक्यावर जरी सीसीटीव्ही कॅमेरे लावले तरी बेकायदा वाळू उपशावर लगाम लागेल. तलाठ्यांचा सर्व्हे तसेच पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागातर्फे नियमित पाहणी केली जाते. त्यांना कधीच बेकायदा वाळू उपसा दिसून आला नाही, हे विशेष. 

 

पाटबंधारे विभागावरही संशयाची सुई 

पाथरी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काहीजण गावातून तर काही जण स्मशानभूमीच्या रस्त्याने वाळू गाड्या बाहेर आणतात. एका शेतकऱ्यांच्या शेतीजमिनीतूनही काही गाड्यांची वाहतूक होत आहे. परिसरातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे दरवाजे नीट लावले जात नाहीत, त्यामुळे पाणी वाहून जाऊन पात्र कोरडे पडते. वाळू माफियांना आयतेच कुरण मिळते. यात कृष्णा खोरे पाटबंधारे विभागातील काहींचा हात असावा, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा उपसा मागील वर्षीपासून सुरू आहे. यंदा दोन महिन्यापूर्वी पाणी नसल्याने या भागात वाळू उपसा सुरू आहे. तसेच मागील १५ दिवसांपासून याला खूप वेग आला आहे.

 

कोट्यवधी रुपयांचे नुकसान 

कायदेशीर वाळू उपसा करण्याचा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ सप्टेंबर आहे. मात्र बेकायदा वाळू उपसा वर्षभर सुरू आहे. दरवर्षी वाळू लिलावातून प्रशासनाला साधारण ८० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. यंदा यांत्रिक बोटीच्या वाळू उपसावर बंदी घातल्यामुळे लिलाव प्रक्रिया रखडली आहे. उपलब्ध वाळू सरकारी कामांसाठी प्राधान्यांने देण्यात येणार आहे. शिल्लक राहिली तर ती खासगी वापरासाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. 

 

"तो' वाहतूक शाखेचा पोलिस कोण? 
शनिवारी पहाटे सहायक पोलिस निरीक्षकांनी सैफुल येथे वाळू ट्रक पकडला. त्यानंतर वाहतूक पोलिस तेथे पोहाेचला आणि त्याने ट्रक सोडण्यास सांगितले. कारवाई करण्यास आडकाठी आल्यामुळे ट्रक पसार झाला. याप्रकरणाची कंट्रोलला नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी याच्या चौकशीची जबाबदारी सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे यांना दिली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. 

 

कारवाई तीव्र करू 
जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई करीत ६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. कारवाई सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे वाळू लिलाव झाल्यानंतर त्या मक्तेदाराला सांगून लावले जातात. प्रशासन लावत नाही. जिल्हा प्रशासनाकडून अजून कारवाई तीव्र करू- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी 


 १४ जणांना पोलिस कोठडी 

तांडोर येथील अवैध वाळू उपसाप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १७ पैकी १४ जणांना येथील न्यायाधीश एम. बी. असिजा यांनी १५ मार्चपर्यंत दिवसांची पोलिस कोठडी दिली. तिघा अल्पवयीन संशयितांची मंगळवारी सोलापूरच्या बालसुधारगृहात रवानगी केली जाणार आहे. १२ संशयित गायब आहेत. ११ मार्च रोजी संशयित हे तांडोर येथे बेकायदा वाळू उपसा, वाहतूक करताना आढळले होते. पोलिस शिपाई अंकुश मोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वाळू चोरी, शासकीय कामात अडथळा, शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. 
जयप्पा सहदेव गायकवाड, हमीद नबीसाब इनामदार, परशुराम रंगनाथ पुजारी, किरण सुरेश नागणे, वैभव विलास पाटील, बालाजी दगडू मळगे, अर्जुन गोपाळराव जाधव, सागर मारूती बिले, सुरेश उत्तम पवार, विशाल जगन्नाथ पवार, महादेव पंडीत अधटराव, उमेश विठ्ठल भायकट्टी, गणेश चंद्रकांत लोखंडे, दामोदर बाळू शिंदे अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. रवींद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे, उमेश घाडगे, ऋतुराज ताड, सुरेश ऊर्फ बिबल्या रामा काळे, सचिन काळे, किशोर रामा काळे, विक्या भीमसिंग भोसले, शंकू सुरेश काळे, संजय शरणप्पा भोसले, सूरज शरणप्पा भोसले, अमित शरणप्पा भोसले, शरद जाफर पवार यांचा पोलिस शोध घेत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...