आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - महाशिवरात्र हा भोळ्या शंकराचा उत्सव. आजच्या दिवशी शिवलिंगास किंवा शिवमूर्तीस बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान किंवा फळ वाहून पूजा केली जाते. विशेष म्हणजे शहरात केवळ ७० च्या आसपास झाडे असली तरी त्याची पाने तोडू दिली जात नाहीत. मग संपूर्ण शहराच्या भावना पूर्तीसाठी शहरातील सात ते आठ पत्री शिवलिंग स्वामी हे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जाऊन पाने तोडून आणत भक्तांची गरज भागवतात.
शहरात संगमेश्वर कॉलेजमध्ये दाेन, रूपाभवानी मंदिराजवळील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी म्हणजे रुद्रभूमीत ५० ते ६० झाडे व बोरामणी नाका परिसरातील शेतकरी फार्ममध्ये दोन झाडे अशी मोजकीच ६० ते ७० च्या आसपास ही झाडे आहेत. याची पाने तोडू दिली जात नाहीत. त्यामुळे पत्रीस्वामी असे बिरूद असणारी सात ते आठ मंडळी ही सेवा अत्यल्प शुल्कात देतात. श्रावण महिन्यात दिवसाकाठी किमान एक ट्रक तर फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी दोन ट्रक बेल लागत असल्याचे शिवलिंग पत्री-स्वामी सांगतात. या झाडाची पाने केवळ स्वामींनी तोडावीत असा समज असल्याने ती तोडता येत नाहीत. शिवाय ही झाडे कुणी लावतही नाहीत. केवळ शेतकी महाविद्यालयात अभ्यासासाठी आणि रूद्रभूमीमध्ये अंत्यविधीच्या पवित्र कार्यासाठी याची लागवड होते.
येथून आणतात बिल्वपत्रे
कर्नाटक सीमेवरच्या मंठाळ, तडमड, अणदूर, कुंभारी, चिवरी, अल्ली बुद्रूक, धनाळी, कासेगाव, मार्डी, भोगाव आदी भागातून ही पाने आणली जातात. मोहोळ येथील मसले चौधरीत बेलाची ५० ते ६० झाडे आहेत. येथूनही पाने आणत विक्री केली जाते.
मागील ४० वर्षांपासून ही सेवा देत आहे. यात आम्हाला आनंद आहे. झाडांचे मालक पैसे मागत नाहीत. शहरात ही झाडे लावातीत, जेणेकरून सर्वांची सोय होईल.
- शिवलिंग स्वामी
आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदल रससेवनाला महत्त्व दिले आहे. याला आयुर्वेदात अमृत-फळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर केला जातो, केवळ गरोदर स्त्रीला बेल देत नाहीत.
- वैद्य अशोक मंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.