आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सेनेची बोट पकडून मोठी झाली, आता खंजीर खुपसला; मंत्री रामदास कदमांची खदखद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शिवसेनेची वाढ होईल, या भीतीने केंद्रात १९ खासदार असतानाही सेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे बोट पकडून राज्यात मोठी झाली. आज तीच भाजपा पाठीत खंजीर खुपसून सेनेला संपवण्याचे काम करत आहे, असा आरोप राज्याचे पर्यावरणमंत्री तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री रामदास कदम यांनी केला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचार असल्याची टीकाही केली.

 

रामदास कदम हे रविवारी सोलापूरला खासगी दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उपस्थित शिवसैनिकांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, ज्या वेगाने भाजपा मोठी झाली त्याच्या दुप्पट वेगाने ती खाली येत आहे. मागील लोकसभेला शिवसेना होती म्हणून लोकांनी भाजपच्या उमेदवारांना जिंकून दिले.

 

युतीमध्ये शिवसैनिकांनी भाजपचा उमेदवार निवडून यावा, याकरिता जिवाचे रान केले. मात्र त्याच वेळी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल, यासाठीच प्रयत्न केले. हा विश्वासघातच आहे.
भाजप नेहमीच शिवसेनेला संपवण्याचे षडयंत्र रचत आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती तोडल्याचे जाहीर केले, ते योग्यच असल्याचे कदम यांनी सांगितले.

 

बैठकीचे प्रास्ताविक शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांनी केले. या वेळी राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हा प्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, प्रकाश वानकर, विजय पुकाळे, महेश धाराशिवकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकांचा मोदींवर प्रचंड रोष
मोदी पंतप्रधान झाल्यावर लोकांच्या आशा वाढल्या होत्या. पाकिस्तानला चांगला धडा शिकवतील असे वाटले होते. मात्र मोदी हे लाहोरमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचे केक कापत राहिले आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक सीमेवर भारतीय सैनिकांच्या माना कापत राहिले. मोदी यांना याची शरम वाटायला पाहिजे होती. मात्र ते सांगत राहिले माझी छाती ५६ इंचांची आहे. नोटबंदी, जीएसटी या सारख्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोदींवर प्रचंड राेष आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...