आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोटमध्ये उद्या शिवसृष्टीचे लोकार्पण, 1 कोटी रुपये खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट- येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सुमारे एक कोटी रुपये खर्चून साकारलेल्या शिवसृष्टीचे मंगळवारी (दि. १) महाराष्ट्र दिनी सायंकाळी ६.०५ वाजता लोकार्पण होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिली. लोकार्पणानंतर भित्तीशिल्पांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्वाचे गड, किल्ले यांचे दर्शन घडणार आहे. 


या कार्यक्रमास अन्नछत्र मंडळाचे सचिव श्याम मोरे, मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर यांच्यासह विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मंडळाचे अध्यक्ष भोसले यांच्याकडे शिवसृष्टीची संकल्पना मांडली होती. त्यानुसार मंडळाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे शिल्पकार विवेक खटावकर यांच्याद्वारे उभारणी केली. दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष भोसले यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवाजी महाराज मंदिरात शिवसृष्टी निर्मितीचा संकल्प सोडला होता. 


आदींचा आहे समावेश 
शिवसृष्टीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरीसह रायगड, तोरणा, पुरंदर, सिंधुदुर्ग, प्रतापगड, राजगड, रायगड, वेल्लोरी, गोव्यातला अग्वाद भुईकोट किल्ला आदींचा समावेश आहे. कोल्हापूरच्या चौगुले यांनी बनवलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, मावळेही आहेत. शिवसृष्टीसमोर संगीतमय कारंजा आहे. ५० खांबांमध्ये खास विद्युत कंदील बसवून पथदिव्यांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना दोन आकर्षक तोफाही बसवल्या आहेत. शिल्पांच्या निर्मितीत मधुकर जिनगरे, रोहित गोळे (पुणे) यांचाही वाटा आहे. 


युवांसाठी प्रेरक 
अक्कलकोट हे छत्रपती भोसले यांच्या शौर्याचे शक्ती केंद्र आणि दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ यांचे भक्ती केंद्र आहे. अशा ठिकाणी अन्नछत्र मंडळाने उभारलेली शिवसृष्टी युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
- जन्मेजय भोसले, अध्यक्ष, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट 

बातम्या आणखी आहेत...