आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पन्न बाजार समिती अपहार प्रकरण; माजी संचालकांचा अंतरिम जामीन मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समितीतील अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संचालक व सचिव यांना मूळ अटकपूर्व जामीन अर्जाचा निकाल लागेपर्यंत अंतिरम जामिनाचा आदेश सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी आज दिला. यापूर्वी या संचालकांना मिळालेल्या अंतरिम जामिनाची मुदत ११ जून पर्यंतच होती. 


कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी लेखापरीक्षक संजय काकडे यांनी जेलरोड पोलिसांत तत्कालीन संचालक व सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच संचालकांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान या अर्जाची सुनावणी होऊन ११ जूनपर्यंत अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला होता. १२ जून रोजी मूळ अर्जाच्या सुनावणीवेळी व निकालावेळी न्यायालयात राहण्याचा आदेश दिला होता. यावर १३ जून रोजी न्यायालयात अर्ज दाखल करून अंतरिम जामिनाची मुदत ११ जूनपर्यंतच असल्याकडे लक्ष वेधले. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयात हजर राहण्यास आले तर पोलिस त्यांना अटक करतील. त्यामुळे संचालकांना अंतरिम जामीन मंजूर करावा. जर मुख्य जामीन अर्ज नामंजूर झाला तर त्यांना पाच दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद मांडण्यात आला. 


यावर न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मांडून सुनावणी घेतली. मूळ जामीन अर्जाचा निकाल होईपर्यत अर्जदारांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या प्रत्येक तारखेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले. जामीन अर्जाची पुढील सुनावणी १८ जून नेमण्यात आली आहे. 


यांचा जामीन मंजूर 
दिलीप ब्रम्हदेव माने, इंदुमती अलगोंडा पाटील, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सोजर पाटील, उत्तरेश्वर घुटे, ऊर्मिला शिंदे यांच्यातर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने यांनी काम पाहिले. नागराज कल्याणराव पाटील, शंकर नागनाथ येणगुरे, चंद्रकांत आमसिद्ध तुपसंगे, रजाक शेख, अहमद निंबाळे, अशोक आनंदराव देवकते, पिरप्पा गुरुसिद्ध म्हेत्रे, धोंडीराम नारायण गायकवाड, बाळासाहेब शेळके यांच्यातर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले. सचिव धनराज कमलापुरे, उमेश दळवी यांच्यातर्फे अॅड. भारत कट्टे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...