आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती : मुस्ती, बोरामणीत उत्सुकता, विजयाची लॉटरी कोणास?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- मुस्तीत काँग्रेस व भाजपने तरुण नेतृत्व असलेले श्रीशैल नरोळे व सिध्दाराम हेले यांना एकमेकांविरुध्द फडात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी दंड थोपटले आहे. तेव्हा तिरंगी लढतीत कोण कोणास चीतपट करणार याचीच या गणात चर्चा जोरात आहे. तर बोरामणी गणात काँग्रेसने राजकुमार वाघमारे या शिपायाची लढत भाजपचे प्राचार्य असलेले विश्रांत गायकवाड यांच्याशी लावली आहे. तेव्हा या दोन्ही गणातून विजयाची लाॅटरी कोणास लागणार पाहावे लागेल. 


मुस्ती गणात काँग्रेस आघाडीने माजी कृषी सभापती श्रीशैल नरोळे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने निष्ठावान सामान्य कार्यकर्ता असलेले सिध्दाराम हेले यांना संधी दिली आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील तिरंगी लढतीकडे सर्वांच्या नजरा आहेत. नरोळे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना या भागाचे नेतृत्व केले आहे. वडील (कै.) बसवेश्वर नरोळे यांच्या सामाजिक कार्यामुळे या कुटुंबावर परिसरात लोकांची श्रध्दा आहे. शिवाय काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व काँग्रेस नेत्यांची फळी त्यांना साथ देत आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत नरोळे बाजी मारणार असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. 


भाजपचे उमेदवार सिध्दाराम हेले यांचे या भागातील सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तांदूळवाडी गाव या गणात नसले तरी भाजपच्या माध्यमातून त्यांनी मुस्ती भागात धडपड्या कार्यकर्ता म्हणून वेगळा ठसा निर्माण केला आहे. बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत केवळ एका मताने ते पराभूत झाल्याने सर्वांनाच चटका लागला होता. तेव्हा या निवडणुकीत कमळ फुलविण्याची संधी मतदार त्यांना देणार का? पाहावे लागेल. 


बोरामणी (अनुसूचित जाती राखीव) गणात काँग्रेस महाआघाडीने (कै.) उमाकांत राठोड यांच्या मुशीतून तयार झालेला सामान्य कार्यकर्ता राजकुमार वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने उच्चशिक्षित प्राचार्य विश्रांत गायकवाड यांना संधी दिली आहे. शिस्तप्रिय शिक्षक अशी त्यांची परिसरात प्रतिमा आहे. गायकवाड यांचे बंधू डी. एन. गायकवाड रिपाइंचे असले तरी काँग्रेस नेत्यांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे ते बाजार समितीचे दोन वेळा संचालक झाले. सध्या ते गुन्हा दाखल झाल्याने बेपत्ता आहेत. पण त्यांच्या जनसंपर्काचा व कामाचा फायदा गायकवाड यांना प्रचारात होताना दिसतो आहे. 


काँग्रेसने जिल्हा परिषदेची उमेदवारी न दिल्याने पत्नी संगीता रिंगणात उतरवून गायकवाड यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी चांगले मतदान झाल्याने गायकवाड यांचे बंधू विश्रांत गायकवाड यांना या निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली आहे. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याच्या जोरावर तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख व सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठबळावर गायकवाड यांचा विजयावर दावा आहे. 


काँग्रेस महाआघाडीने बोरामणी या मोठ्या गावचे राजकुमार वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. वाघमारे यांची उमाकांत राठोड यांचा कार्यकर्ता अशी ओळख परिसरात आहे. शिवाय त्यांच्या शाळेत शिपाई आहेत. बोरामणी गावासह उमाकांत राठोड समर्थकांच्या पाठबळावर त्यांचे विजयाचे गणित आहे. प्रचारात दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते वाड्यावस्त्या पिंजून काढत आहेत. त्यामुळे येथे उच्चशिक्षित प्राचार्य गायकवाड विरुध्द शिपाई वाघमारे यांच्यामध्ये खरी लढत आहे. 


अपक्ष सिद्रामप्पा पाटील यांचे आव्हान 
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी हवी होती. पण विधानसभेचे राजकीय समीकरणाचे गणित घालत आमदार म्हेत्रे यांनी नरोळे यांना संधी दिली. त्यामुळे अक्कलकोट बाजार समिती संचालक पदाचा राजीनामा देऊन सोलापूर बाजार समितीत घुसण्याच्या त्यांच्या इच्छेला सुरुवातीलाच झटका बसला. कारण काँग्रेस व भाजप दोघांच्या पॅनलने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. आमदार असताना केलेल्या कामावर त्यांना विजयाची आशा आहे. पण या गणात हे तीनही उमेदवार मातब्बर असल्याने विजयाची लाॅटरी कोणाला लागते लवकरच कळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...