आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंदारेंच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेत दुफळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा 'बाजार' जोरात सुरू झाला असून नान्नज गणात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गणात भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीच्या वतीने उभे असलेल्या प्रकाश चोरेकर यांच्यात सामना रंगला आहे. कळमण गणात पारंपरिक विरोधकांचा सामना होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे. 


बाजार समितीच्या नान्नज गणात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजप नेते इंद्रजित पवार यांच्या उमेदवारीमुळे पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नान्नज, बीबी दारफळ, रानमसले या तीन मोठ्या गावांचा या गणात समावेश असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रकाश चोरेकर हे नान्नज गावचे आहेत. प्रचारात चोरेकर स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करत आहेत तर पवार लोकमंगलच्या माध्यमातून बीबी दारफळ व परिसरात झालेल्या विकासाचा मुद्दा समोर ठेवत आहेत. या निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगत असली तरी स्थानिक शिवसेना भाजपसोबत असल्याचे दिसत आहे. नान्नजचे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गवळी व इतर शिवसैनिक भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत. बीबी दारफळ गावात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील-ननवरे हे पारंपरिक विरोधक जनमत अजमावत आहेत. तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील गट भाजप तर विरोधी माजी सरपंच शिवाजी ननवरे यांचा गट चोरेकरांच्या प्रचारला लागला आहे. 


कळमण गटात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे विरुद्ध कौठाळी येथील संग्राम पाटील यांच्यात लढत होणार आहे. वडाळा परिसरात बळीराम साठे आणि दिलीप माने गटातच निवडणुका होत असतात. पण या बाजार समितीच्या निवडणुकीत साठे व माने गटाने युती केली आहे. ही युती माने गटाचे संग्राम पाटील यांना मान्य नसल्याने एेन निवडणुकीत त्यांनी भाजपच्या पॅनलमधून उमेदवारी घेत त्यांनी साठे यांच्यासमोर आव्हान जिवंत ठेवले आहे. बुधवारी कौठाळी येथे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीने मोठी जाहीर सभा घेत शक्तिप्रदर्शन केले तर भाजपने रानमसले-बीबी दारफळ येथे सभा घेत प्रचार केला. दोन्ही गणात कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...