आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बाजार समितीवर दिलीप माने यांचे वर्चस्व कायम, पणनमंत्री सुभाष देशमुख पॅनेलचे पानिपत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख अशी लढत झालेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पानिपत झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने माजी आमदार दिलीप माने यांनी १५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. सहकारमंत्र्यांच्या गटाला फक्त दोन जागा मिळाल्या. कंदलगाव व कणबस गणामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत चुरस पाहण्यास मिळाली. कंदलगाव गणातून अप्पासाहेब पाटील तर कणबस गणामध्ये शिवसेनेचे अमर पाटील विजयी झाले. बाजार समिती निकालामुळे दक्षिण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शेतकरी मतदारसंघातून कुंभारी गणातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख सर्वाधिक ३०२३ मते घेऊन विजयी झाले. 


प्रतिस्पर्धी शिरीष पाटील यांचा २२४४ मतांनी पराभव झाला. कळमण गणातून जितेंद्र साठे यांनी प्रतिस्पर्धी संग्राम पाटील यांचा १५६४ मतांनी पराभव केला. हिरज गणातून दिलीप माने यांना २२५१ मते मिळाली. त्यांनी श्रीमंत बंडगर यांचा १३२१ मतांनी पराभव केला. मंद्रूप गणातून इंदुमती अलगोंडा पाटील ७७३ तर औराद गणातून बाळासाहेब शेळके ५३५ मतांनी विजयी झाले. मुस्ती गणातील अपक्ष उमेदवार माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व भंडारकवठे गणातील शिवशरण पाटील बिराजदार यांना पराभवास समोरे जावे लागले. सिद्रामप्पा पाटील यांचा श्रीशैल नरोळे यांनी ७८२ मतांनी तर वसंतराव पाटील यांनी शिवशरण पाटील यांचा ४०२ मतांनी पराभव केला. व्यापारी मतदारसंघातून बसवराज इटकळे व केदार उंबरजे विजयी झाले. इटकळे यांना ६५७ तर उंबरजे यांना ७०० मते मिळाली. हमाल तोलार मतदारसंघातून शिवानंद पुजारी ३३ मतांनी विजयी झाले. पुजारी यांनी गफार चांदा यांचा पराभव केला. 


पुन्हा दिलीप मानेच किंगमेकर... 
बाजार समिती निकालामुळे माजी आमदार दिलीप माने पुन्हा एकदा किंगमेकर ठरले आहेत. मागील निवडणुकीत माजी मंत्री आनंद देवकते यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुक्यातील सर्व नेत्यांना एकत्रित आणून बाजार समितीची निवडणूक एकहाती ताब्यात घेतली होती. यंदा पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना एकत्र आणून बाजार समितीची सत्ता ताब्यात घेतली. दक्षिणमधील ९ पैकी ७ तर उत्तरमधील ६ पैकी ६ जागांवर विजय मिळवून दिलीप माने यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. 


शेतकऱ्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू 
बाजार समितीची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसारच लावावी लागली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला असे सांगत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी चौकशी लावली, ३२ जणांवर गुन्हे दाखल केले, निवडणुकीत अर्ज बाद केले. पण आम्ही डगमगलो नाही. शेतकऱ्यांनीही आमच्यावर विश्वास ठेवून विकासाला मतदान केले. आमचे १३ उमेदवार निवडून दिले. बाजार समितीमध्ये काम करून शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. 
- दिलीप माने, माजी सभापती 


...मी त्यांच्याच पाठीशी 
मी अविरोध निवडून येण्याची संधी असताना माझ्यासमोर मुद्दामहून उमेदवार देण्यात आला. आता कुणीही सभापती होवो, मी त्यांच्या मागे ताकद लावून उभा राहणार आहे. 
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 


दहशत अजूनही कायम 
बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला, याचे समाधान आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रात मागील अनेक वर्षांची दहशत कायम आहे. धनशक्तीमुळे जनशक्तीचा पराभव झाला. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. 
- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री 

बातम्या आणखी आहेत...