आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती निवडणूक, चित्र आज स्पष्ट होणार; काँग्रेस आणि भाजप पॅनेल जाहीर करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस. याच दिवशी काँग्रेस अाणि भाजप पॅनेल जाहीर करणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. काँग्रेसने रविवारीच प्रचाराचा नारळ फोडला तर भाजप मंगळवारी पॅनेल जाहीर करून प्रचारास सुरुवात करणार आहे. 


काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली. नेत्या-कार्यकर्त्यांची एकी दाखवण्यासाठी रविवारी बैठक घेतली. तीत उमेदवार निवडीचे अधिकार माजी आमदार दिलीप माने यांच्याकडे देण्यात आले. सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार असल्याचे श्री. माने यांनी स्पष्ट केले. 


प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री. म्हेत्रे बैठकीला येऊ शकले नाहीत. परंतु मोबाइलवरून त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, की माने-शेळके यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांना निवडून द्या. श्री. माने म्हणाले, सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही. ज्यांना मिळाले नाही, त्यांनी नाराज न होता जोमाने काम करावे. विरोधकांना धडा शिकवण्यासाठी एकजूट महत्त्वाची अाहे. 


सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पणन कायद्यात बदल करून शेतकरी केंद्रस्थानी ठेवला. नवीन निवडणूक रचना केली. त्यामुळे निवडणूक खर्चात वाढ झाली तरी हरकत नाही. छोट्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी पणन मंडळाकडून कर्ज देण्याची व्यवस्था केली. पूर्वीच्या रचनेत विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. ती मोडीत काढण्यासाठी कायद्यात बदल आवश्यकच होते. बाजार समितीच्या बरखास्तीवर बोलताना श्री. देशमुख म्हणाले, "राजशेखर शिवदारे आणि सुरेश हसापुरे यांनी चौकशीची मागणी केली. त्यानुसार झालेल्या चौकशीत संचालक दोषी आढळले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. यात मी स्वत: काहीही केलेले नाही." जिल्हा बँक बरखास्त करण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेने केली. त्यात सहकार खाते मध्यस्थाच्या भूमिकेत होते. असा खुलासाही सुभाष देशमुख केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या निवडणुकीत शड्डू ठाेकले आहे. परंतु त्यांना सर्व जागांसाठी उमेदवार मिळाले नाहीत. औराद (ता. दक्षिण सोलापूर) गणात उभारलेले जिल्हाध्यक्ष महमूद पटेल आणि नान्नज गणातून पोपट साठे यांना हे दोघेच निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी संघटनेची बैठक झाली. तीत जिल्हा निवडणूक निरीक्षक शिवाजी पाटील (माढा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी खा. राजू शेट्टी यांना फोनवर सम्पर्क साधून येथील स्थिती सांगितली. या वेळी उमाशंकर पाटील, महावीर सावळे, इक्बाल मुजावर, सत्यवान गायकवाड, वसंत गायकवाड आदी उपस्थित होते. 


७ जणांची माघार 
सोमवारी अविनाश महागावकर, गणेश वानकर यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मंगळवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात अर्ज माघारीसाठी मोठी गर्दी होईल. छाननी प्रक्रियेत ३५ जणांचे अर्ज नामंजूर झाल्याने ३५९ अर्ज शिल्लक होते. सात जणांनी अर्ज माघार घेतल्यानंतर आणखी ३५२ अर्ज शिल्लक आहेत. शेतकरी मतदारसंघातून नान्नज गणातून संतोष साठे, पाकणी गणातून गणेश वानकर, मुस्ती गणातून अविनाश महागावकर, मंद्रुप गणातून प्रभावती खेडकर तर भंडारकवठे गणातून राजशेखर बिराजदार-पाटील यांनी अर्ज माघार घेतला आहे. हमाल-तोलार मतदारसंघातून सिद्धाराम तमशेट्टी व शिवप्पा धुप्पाधुळे यांनी माघार घेतली.

बातम्या आणखी आहेत...